....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी

author img

By

Published : Sep 18, 2021, 6:26 PM IST

Updated : Sep 18, 2021, 6:48 PM IST

SHARAD PAWAR
SHARAD PAWAR ()

राज्याच्या हितासाठी पूर्वी अनेकदा वाद झाले. त्यावेळी सुसंवाद असायचा, आता कोथळा काढण्याची भाषा केली जाते, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची कान उघडणी केली. मुंबईतील गोरेगाव येथील मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी अलिकडच्या काळातील राजकीय वक्तव्यांचा समाचार घेतला. नेत्यांच्या बेताल वक्तव्यांवर त्यांनी आज भाष्य केले. तसेच एकप्रकारे नाराजी व्यक्त केली. राज्याच्या हितासाठी पूर्वी अनेकदा वाद झाले. त्यावेळी सुसंवाद असायचा, आता कोथळा काढण्याची भाषा केली जाते, अशा शब्दांत शरद पवार यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांची कान उघडणी केली. मुंबईतील गोरेगाव येथील मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने करण्यात आले होते. समाजवादी चळवळीतील मृणालताई गोरे नावाचा झंझावात कलाविष्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ओळख दाखवणारा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, असे गौरोवद्गार शरद पवार यांनी काढले. मृणालताई गोरे यांच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

बेताल वक्तव्य करणाऱ्यांची कान उघडणी

नेत्यांची बेताल वक्तव्ये वाढू लागली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसले, असा आरोप केला. शिवसेनेकडून त्याला संजय राऊत यांनी प्रतिउत्तर देताना, आम्ही खंजीर खुपसत नाही, तर समोरुन कोथळा काढतो, असे वक्तव्य केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना आमदाराने कोथळा काढण्याचे विधान केले. राज्यात यावरुन चांगलाच वाद रंगला होता. आज शरद पवार यांनी हा धागा पकडत, मृणालताई गोरे यांच्याबरोबर सदनामध्ये अनेकवेळा वाद झाले. परंतु ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद त्यावेळी साधला जायचा. तो आता पहायला मिळत नाही. आता तर कोथळा काढायची भाषा केली जाते, असे सांगत बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची चांगलीच कान उघडणी केली.

काय म्हणाले शरद पवार

मृणालताई व आम्ही विधिमंडळात एकत्र होतो. राजकीय मतभेद प्रचंड होते. व्यक्तिगत सलोखा तितकाच होता. १९७२ला वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मला गृह राज्यमंत्री पदाची पहिली संधी मिळाली. भाऊसाहेब वर्तक त्यावेळी अन्न व नागरी विभागाचे मंत्री होते. महागाईचा प्रश्न होता. त्याचे नेतृत्व अहिल्याताई व मृणालताईंनी घेतल्याचं आम्ही पाहिलं. यात प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी मुंबईत केला. वर्षभर हा संघर्ष सुरू होता. दरम्यान नाईकसाहेबांनी मला बोलावून घेतलं आणि गृहखात्यासोबत अन्न व नागरी विभागाचे खाते घे आणि फक्त या लाटणेवाल्यांना संभाळायचं काम कर, असे त्यांनी सांगितले. साहजिकच यासाठी ताईंशी सुसंवाद ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम करताना थोडा जरी विलंब झाला तर लाटण्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय गत्यंतर नव्हते. विधिमंडळात मी मुख्यमंत्री झालो. त्याआधीच्या काळात मृणालताई या विरोधी पक्ष नेत्या होत्या. अनेक प्रश्नांवर त्या कडाडून हल्ला करायच्या. अशा आठवणी सांगत पवार यांनी मृणालताई गोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मृणालताईंच्या एका वेगळ्या पद्धतीच्या स्मारकाचा विचार केला गेला याचे मला समाधान आहे. त्यांच्या सबंध जीवनाचे दर्शन या फोटोंच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे दर्शन केवळ त्यांच्यापुरते नाही तर महाराष्ट्रातील चळवळी, समाजकारण, राजकारण, महाराष्ट्रातील बदलतं चित्र या सगळ्याबद्दल एक सिंहावलोकन करण्याची संधी या दालनाच्या माध्यमातून मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन सामाजिक रोगावर उपचार करण्यासाठी चूल, घरातील लाटणे, हंडे आणि थाळ्यांसारखी हत्यारे हाती घेऊन संघर्ष उभा करणाऱ्या मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली खरी श्रद्धांजली आहे. हे दालन नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरणार असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - हिंमत असेल तर सोमैय्यांनी जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत; सोमवारी कागलमध्ये एकवटणार मुश्रीफांचे कार्यकर्ते

पुन्हा एकत्र येणार नाही - सुभाष देसाई

मृणालताई गोरे यांनी निवारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न हाती घेऊन रस्त्यांवर उतरायच्या, असे सांगत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील त्यांची प्रशंसा केली. तसेच औरंगाबादमध्ये आजी, माजी व भावी सहकाऱ्यांबद्दलच्या केलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री बोलल्यांनातर चर्चा होणारच आणि चर्चा झाली तर वावग नाही. जे आमच्याबरोबर येतात ते सहकारीच होतात. आता त्यात त्यांना अभिप्रेत काय आहे, हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील. त्यातून आणखी अर्थ शोधण्याची गरज नाही. आजकालच्या राजकारणाला जे विकृत रूप येत जात आहे. त्यातून त्यांनी एक उपाययोजना सुचवली आहे, समान उद्दिष्टासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. पण, मला नाही वाटत की एकत्र येऊ, राजकीय नाहीच. तो विषयच नाही. राज्यसरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा दावा देसाईं यांनी यावेळी केला.

हेही वाचा - जाणून घ्या, कोण होणार पंजाबचा नवा मुख्यमंत्री, 'ही' तीन नावे चर्चेत

Last Updated :Sep 18, 2021, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.