'मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार'

author img

By

Published : Nov 24, 2020, 10:53 AM IST

Uddhav Thackeray

वसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणी कपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

मुंबई - शहरातील मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला. तसेच या प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली

वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकल्प नक्कीच लाभदायक
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणी कपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होणार
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध असणार आहे. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे. मनोर येथे पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. पायाभूत सुविधा सहज उपलब्ध होऊ शकतात. मनोर येथे शासनाचा भूखंड उपलब्ध आहे तसेच रस्तेही उपलब्ध आहेत. या ठिकाणी नागरी वसाहत नसल्याने हा प्रकल्प विना व्यत्यय पूर्ण होऊन मुंबईच्या नागरिकांना कपातीविना नियमित पाणी पुरवठा होणार आहे.

अडीच ते तीन वर्षांचा कालावधी
मनोर येथे 25 ते 30 एकरामध्ये हा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून 200 एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात क्षमता वाढविण्यासाठी सोयीस्कर आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारत: अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सादरीकरणात सांगितले.

हेही वाचा -कोरोनाची लाट नव्हे सुनामी येणार, लॉकडाऊनचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका - मुख्यमंत्री

हेही वाचा -'मागे झालेलं लक्षात ठेवण्यासारखं नाही, यापुढे योग्य वेळी शपथ घेईल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.