ETV Bharat / city

राजकीय षडयंत्रातून 12 आमदारांच्या निलंबनाची यादी तयार केली गेली; शेलारांचा आरोप

author img

By

Published : Jul 8, 2021, 6:43 AM IST

निलंबनासाठी 12 आमदारांच्या नावाची यादी तयार
निलंबनासाठी 12 आमदारांच्या नावाची यादी तयार

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कोणतेही गैरवर्तन केले नाही, कोणालाही शिवीगाळ केली नाही, तसेच निलंबनाची कारवाई करण्याआधी आमदारांचे म्हणने देखील मांडण्याची संधी दिली गेली नसल्याची खंत आशिष शेलार यांनी व्यक्त केली. त्यामुळे या निलंबनाच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असेही यावेळी आशिष शेलार म्हणाले.

मुंबई- तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष न्यायालयात जाणार असल्याचे निलंबित आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. न्यायालयात जाण्याआधी या पूर्ण घटनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असेही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. राजकीय षडयंत्र करून 12 आमदारांची नावे सरकारी पक्षाकडून घेण्यात आली. या 12 आमदारांच्या नावांची यादी का तयार करण्यात आली याचाही खुलासा लवकरच करणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कोणतेही गैरवर्तन केले नाही, कोणालाही शिवीगाळ केली नाही, तसेच निलंबनाची कारवाई करण्याआधी आमदारांचे म्हणने देखील मांडण्याची संधी दिली गेली नसल्याची खंत आशिष शेलार यांनी व्यक्त केली. त्यामुळे या निलंबनाच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असेही यावेळी आशिष शेलार म्हणाले.

सीसीटीव्ही फुटेज समोर ठेवावेत

महाराष्ट्र विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याचे कारण देत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात घडलेल्या घटनेत पूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आणले गेले पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली. तसेच घटना घडत असताना उपाध्यक्ष यांच्या दालनात शिवसेनेचे आमदारही होते. त्या आमदारांवर कारवाई का केली गेली नाही? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

महापालिका निवडणुका समोर ठेऊन कारवाई-

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत निलंबित केलेल्या 12 आमदारांपैकी चार आमदार हे मुंबईचे आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक समोर ठेवून शिवसेनेने जाणून-बुजून या चार आमदारांची नावे घातली असल्याचा आरोप शेलार यांनी केला. तसेच या कारवाईमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला शिवसेना घाबरत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.


गणेशोत्सवावर बंधने का?

राज्य सरकारने गणेशोत्सवावर बंधने का घातली? याचे मला तात्विक आणि वैज्ञानिक कारण अजूनही कळले नाही. घरी स्थापना करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीची उंची दोन फुटाच्या वर होऊन सव्वादोन फूट एवढी झाली तर, कोरोना कसा काय पसरेल? हे अद्यापही आपल्याला समजत नाही, असा टोला आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लगावला. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारकडून जारी केल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आधारावर केल्या गेल्या याचा शोध व्हायला हवा. लपुन-छपुन काही लोकांशी बैठका करून या मार्गदर्शक सूचना बनवल्या जातात. मात्र आम्ही राज्य सरकारला आवाहन करतो की, राज्य सरकारने सर्व गणेश मंडळाची सर्वांसमोर बैठक करत मार्गदर्शक सूचना केल्या पाहिजेत. गणेश मूर्तींवर घातलेल्या उंचीच्या अटीमुळे मूर्तीकारांचे मोठे नुकसान होत असून त्यांना भरपाई देण्याची गरज असल्याचे देखील यावेळी आशिष शेलार म्हणाले. तसेच 47 वर्ष बंद असलेले दारू परवाने जर राज्य सरकार सुरू करत असेल तर, 100 वर्ष जुना गणेशोत्सव सुरू करण्यात राज्य सरकारला काय हरकत? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.