ETV Bharat / city

'कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार'

author img

By

Published : May 28, 2021, 3:34 PM IST

कोरोनामुळे अनाथ झालेल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शालेय शिक्षण विभाग उचलणार आहे.

minister varsha gaikwad
मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई - कोरोनामुळे अनाथ झालेल्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शालेय शिक्षण विभाग उचलणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबतचे पत्रसुद्धा दिले आहे. यावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस

शिक्षणाची जबाबदारी घेणार -

पहिले ते बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलांवरील छत्र हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांना मदत करुन आधार देणे व त्यांना स्वावलंबनाने आयुष्यामध्ये पुन्हा उभा राहण्यासाठी मदत करणे ही महाराष्ट्राची उज्वल परंपरा आहे व ती कोरोनासारख्या साथीच्या महामारीमध्ये निश्चितच जपली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मृत पावले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे. या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून शासनाने त्यांना आधार देणे आवश्यक आहे. म्हणून पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदत सुरु करण्याचे शालेय शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. याबाबत माहिती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

आज होऊ शकते घोषणा-

राज्यभरात कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलामुलींच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहुना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालविकास विभागाच्या बाल संगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनाची आणि आर्थिक मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - सलमान खान मानहानी प्रकरणात केआरकेने दिले कोर्टाला आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.