ETV Bharat / city

Minister Aditya Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपपेक्षा शिवसेना उजवी, आदित्य ठाकरे ठरणार भविष्यातील शिवसेनेचा चेहरा

author img

By

Published : May 10, 2022, 8:16 AM IST

शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जाते. तर हिंदुत्व कोणा एकट्याचे नाही. आम्ही हिंदुत्व कधी सोडलेले नाही आणि आम्हाला आमचे हिंदुत्व भाजपसाठी सिद्ध करण्याची गरज नाही, अशी भूमीका शिवसेनेने वारंवार मांडली आहे.

aditya-thackerays
आदित्य ठाकरे

मुंबई - राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा गाजत आहे. मनसेनेही हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने शिवसेना-भाजपमध्ये कट्टर हिंदुत्ववादाची स्पर्धा लागली आहे. शिवसेनेचे आजवरचे हिंदुत्व, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संविधानानुसार केलेल्या कामांचा मुख्यमंत्री म्हणून जागतिक स्तरावर झालेला गौरव आणि आदित्य ठाकरे यांची वाढलेली लोकप्रियता, यामुळे शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे सध्याच्या हिंदुत्वाच्या वादात देखील शिवसेना उजवी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वारंवार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले, अशी टीका भाजप नेत्यांकडून सातत्याने केली जाते. तर हिंदुत्व कोणा एकट्याचे नाही. आम्ही हिंदुत्व कधी सोडलेले नाही आणि आम्हाला आमचे हिंदुत्व भाजपसाठी सिद्ध करण्याची गरज नाही, शिवसेनेचा आत्मा हिंदुत्व आहे, असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार देतात. आता मुंबई मनपा निवडणूक तोंडावर आली असताना, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत इशारा दिला. भोंगे न उतरवल्यास हनुमान चालीसा लावण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना भोंग्याविरोधात भाष्य केले. तसेच येत्या ५ जूनला अयोध्येत जाणार असल्याचे सांगत मनसेने शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. भाजपनेही मनसेच्या भूमिकेचे स्वागत केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेनेच्या हिंदुत्वाची भाजपला धास्ती - महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आहे आणि सत्ता संविधानावर चालते. त्यामुळे धार्मिक मुद्दे प्रकर्षाने मांडता येत नाहीत. संविधानाच्या कायद्यानुसार सर्वच राजकीय लेखी हमी द्यावी लागते. शिवसेनेने हिंदुत्व सोडले याचा असा अर्थ होत नाही. भाजपला याची पूर्णतः जाण आहे. त्यामुळे मनसेला पुढे आणत शिवसेनेच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. मात्र मनसेने जरी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला असला, तरी शिवसेनेचे राजकारण आजपर्यंत हिंदुत्वावर चालले. आदित्य ठाकरे हे सेनेची तिसरी पिढी आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाचे पारडे जड असून भाजपला त्याची अधिक धास्ती आहे, असे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव साबडे सांगतात. तसेच महाराष्ट्रात स्थानिक समस्यांवर निवडणुका होतात. धार्मिक मुद्दा इथे चालत नाही. त्यामुळे भाजपने आखलेली रणनीती तितकी चालेल असे वाटत नाही. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. मुंबई सारख्या शहरात कुटुंब चालवताना सर्वसामन्याचे आर्थिक बजेटच कोलमडले आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार धार्मिक वादापेक्षा गरजेच्या विषयांना महत्त्व देतील, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव साबडे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंची लोकप्रियता वाढली - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेसोबत सलगी वाढवली आहे. त्यामुळेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मनसे आणि भाजप शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. तर हिंदुत्वाचा मुद्दा सुटू नये, यासाठी शिवसेनेकडून धडपड सुरू आहे. त्यामुळेच मनसे पाठोपाठ शिवसेनेनेही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १० जूनला आयोध्याला जाण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने आयोध्येत येणार आहेत. मात्र महाराष्ट्र वगळता परराज्यात झालेल्या निवडणुकांत शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्व केले होते. महाराष्ट्रात हे चित्र वेगळे आहे. वरळी विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करत आदित्य ठाकरे निवडून आले आहेत. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार विभागाच्या मंत्री पदाची जबाबदारी ही उत्तम सांभाळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंची लोकप्रियता वाढली असून पुढील काळात पक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे मांडतात.

आदित्य ठाकरे सेनेचा भविष्यातील चेहरा - सगळ्याच निवडणुका धार्मिक मुद्द्यांवर होत नाहीत. इथे नागरी समस्यांची बोंब आहे. प्रचंड महागाई वाढली आहे. सामान्य माणसाला जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे सगळ्याच निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर होतील, असे नाही. सरकार चांगले काम करतय का. ? निवडणुकीला सामोरं जाताना काय संकल्प मांडला जाणार, या गोष्टी परिणामकारक ठरतील. राहिला प्रश्न शिवसेनेच्या हिंदुत्वाचा, तर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले याचा अर्थ शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे नाही. सत्तेत असल्याने संविधानानुसार काम करावे लागते. त्यामुळे तिन्ही पक्षांची भूमिका, धोरण वेगवेगळे आहेत. त्यामुळे शिवसेनेचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, असे अधोरेखित होते. शिवाय उद्धव ठाकरे यांनी कधीही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, असे म्हटलेले नाही. उलट सातत्याने पक्षाची भूमिका मांडत आहेत. हिंदुत्वाची भूमिका व्यक्तिगत नसून शिवसेना पक्षाची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत. वरळी विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे भविष्यातील शिवसेनेचे नेतृत्व आहेत. अनेकांना जवळपास ते मान्य देखील आहे. त्यामुळे अयोध्येला उद्धव ठाकरे यांनी जाणे किंवा आदित्य हा मुद्दा नाही. कदाचित देशभरात आदित्य ठाकरेंना चेहरा बनवण्याची पक्षाची भूमिका असावी, त्यामुळे त्यांना लीड केले जात असावे, असे मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.