ETV Bharat / city

पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करायचे असेल तर भाजपला देशभर पराभूत करावे लागेल का?; संजय राऊतांचा सवाल

author img

By

Published : Nov 4, 2021, 3:17 PM IST

देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

sanjay raut
शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते. दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरामध्ये पाच रुपये, तर डिझेलच्या दरामध्ये 10 रुपयांची घट केली आहे. एकीकडे या दरवाढ कमीला भाजपचे नेते दिवाळी भेट म्हणत असताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे. देशातील पोटनिवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ कमी केली. अवघे पाचच रुपये कमी केले. आता पेट्रोल 50 रुपयांनी स्वस्त करण्यासाठी भाजपला देशभर पराभूत करावे लागेल का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

देशात पोटनिवडणुकांमध्ये हरले म्हणून पाच रुपये कमी केले. दरवाढ कमी करण्यासाठी भाजपला कितीवेळा हरवावे लागेल? की पूर्णपणे पराभूत करावे लागेल? तेव्हा 50 रुपयाने दरवाढ कमी होईल का? 2024 नंतर हे दिवस येतील असे वाटते, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

हेही वाचा - पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होऊनही भाव शंभरी पारच; नागरिकांमध्ये नाराजी

  • पेट्रोल-डिझेलच्या पैशातून बेहिशोबी रक्कम कमावली-

पेट्रोल- डिझेलचे भाव केंद्र वाढवत आहे. भाजपचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री केंद्राला दोष देत आहेत. केंद्राने पेट्रोल-डिझेलच्या पैशातून बेहिशोबी रक्कम कमावली आहे, असेही राऊत म्हणाले.

  • देशभरात दिवाळीचे वातावरण नाही -

दिवाळी साजरी करावी असे वातावरण नाही. उद्धव ठाकरे यांनी मात्र वातावरण चांगलं केलं. पेट्रोल-डिझेलचे भाव कमीं केले. पण 5 आणि 10 रुपयांनी नाही भागणार. महागाई वाढली आहे. देशभरात दिवाळीचे वातावरण नाही. भाजपला पूर्णपणे हरवावे लागणार, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

  • आम्ही स्वप्न पाहतो, ते 2024 मध्ये पूर्ण करणार -

आम्ही कोट कधीच शिवत नाहीत. तुमचे कोट लटकलेले आहेत. आम्हाला जिंकल्याचा आनंद आहे. आम्ही स्वप्न पाहतो ते 2024 मध्ये पूर्ण करणार, असा टोलाही राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

  • बाळासाहेब असते तर...-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहणे ही रोज दिवाळी असायची, बाळासाहेब मोठ्या मनाचे होते. त्यांना महाराष्ट्राची काळजी होती. ते होते तेव्हा रोजच फटाके फोडत होते. दिवाळीला त्यांना भेटायचो. आज बाळासाहेब असते तर सध्याची राजकीय परिस्थिती उद्भवली नसती, असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.