मुंबई - शिवसेनेला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता युवा सेनेलाही सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांची आज ( मंगळवारी ) युवासेना राज्य सचिव पदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी किरण साळी यांची नियुक्ती केली आहे. सरदेसाई हे रश्मी ठाकरे यांचे भाचे आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाला शिंदे गटातून दिलेला पहिला हादरा असल्याचे मानले जाते. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करत शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यांच्या बंडानंतर अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी भागातील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने शिंदे गटाकडून शिवसेनेवर दबाव टाकण्यात सुरुवात केली आहे. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई ( Youth Sena Secretary Varun Sardesai ) यांची हाकलपट्टी करून किरण साळी यांची नेमणूक केली आहे.
युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांनी राजकारणात पहिले पाऊल ठेवले. विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची कॅबिनेटमध्ये पर्यावरण आणि पर्यटन मंत्री पदी वर्णी लागली. त्यामुळे युवा सेनेची जबाबदारी वरूण सरदेसाई यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र बंडखोर शिंदे गटाने आज त्यांची उचलबांगडी करत किरण साळी यांची नेमणूक केली आहे. साळी हे गेल्या काही वर्षांपासून सेनेत कार्यरत आहेत. माजी उच्च व त्यांच्या शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ते निकटवर्ती मानले जातात. युवा सेनेत त्यांनी यापूर्वी काम केले आहे.