ETV Bharat / city

Saamna Editorial : त्याच गंगेत हजारो बेवारस मृतदेह वाहताना जगाने पाहिले

author img

By

Published : Dec 15, 2021, 9:30 AM IST

Updated : Dec 15, 2021, 9:56 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा काशी दौरा सध्या चांगलाच गाजत आहे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच! हा कॅमेरा व्यक्तीवर नसून पंतप्रधानांवर आहे अशी टीका राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केली आहे. या संदर्भात आज सामनाच्या अग्रलेखात (Saamna Editorial) दौऱ्याचा समाचार घेण्यात आला आहे. मोदींनी स्नान केले त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस मृतदेह वाहताना जगाने पाहिले. गंगा आक्रोश करत असताना काशीचे खासदार कुठे होते असा सवालही केला आहे.

Uddhav Thakre
उध्दव ठाकरे

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हणले आहे की, पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले . त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो. मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. श्री. राहुल गांधी म्हणतात तेच खरे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच! हा कॅमेरा व्यक्तीवर नसून पंतप्रधानांवर आहे. पाहू, काशी विश्वनाथाच्या मनात काय आहे?

पंतप्रधान मोदी यांची काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी हा मोदींचा मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर मोदी काशीला जाऊन जे धार्मिक, आध्यात्मिक प्रयोग करीत असतात त्याची चर्चा बराच काळ होत असते. मोदी अधूनमधून केदारनाथलाही जात असतात. केदारनाथच्या गुंफेत ध्यानमग्न बसलेल्या पंतप्रधानांची छायाचित्रे मग जगभरात प्रसारित होतात. मोदींची तीर्थयात्रा हा एक प्रकारे राजकीय सोहळाच ठरतो. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र तसेच जगभरात पोहोचले आहे. वाराणसी येथे उभारलेल्या 'काशी विश्वनाथ धाम' प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. गंगा नदी आणि प्राचीन विश्वनाथ मंदिराला जोडणारा हा कॉरिडॉर आहे. हे मोदींचे स्वप्न होते. 700 कोटी रुपये खर्च करून मोदींच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे, पण काही कोटी रुपये उद्घाटन सोहळा आणि प्रसिद्धीवर उडाले आहेत. मोदी यांनी वाराणसी म्हणजे काशीनगरीचा संपूर्ण कायापालट करण्याचे मनावर घेतले आहे. कायापालट करण्यासाठी अनेक जुनी मंदिरे, घरे तोडण्यात आली. अरुंद रस्त्यांचा विस्तार केला. मंदिर परिसराला आकार दिला. मोदी यांनी काशीच्या भूमीवरून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा 'शंख' फुंकला. त्यांची ही काशी यात्रा प्रचारासाठीच असल्याची टीका आता होत आहे. सध्या सगळय़ांच्याच धार्मिक यात्रा राजकीय प्रचारासाठीच होत असतात हे देवांनाही ज्ञात असेल. मोदी यांनी त्यांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला. औरंगजेबाने आक्रमण करताना मंदिरे तोडली. लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करून घेतले, तेव्हा छत्रपती शिवाजी राजांची भवानी तलवार या मोगलाईविरुद्ध भिडली. जेव्हा जेव्हा औरंगजेब निर्माण झाला तेव्हा शिवाजी महाराज ठामपणे उभे राहिल्याची आठवण मोदींनी करून दिली. शिवरायांशिवाय हिंदूंच्या लढय़ाचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खास उल्लेख केला हे महत्त्वाचे. देशातील मंदिरांचा विध्वंस मोगलांनी केला. काशी, मथुरा, अयोध्या या धार्मिक स्थळांवर आक्रमणे करून ती नष्ट केली. सोमनाथाचे मंदिरही तोडले. स्वातंत्र्यानंतर प्रथम सोमनाथाचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांनी घडवून आणला. हिंदुस्थानातील धार्मिक आणि तीर्थस्थळांचा विकास कोणी करत असेल तर त्यांचे कौतुक व्हायला हवे. राजकारण बाजूला ठेवून या विषयाकडे पाहायला हवे. काशीत विश्वनाथ धामचा विकास झाला. त्याचे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल. मोदी यांच्या आधी अनेक हिंदुत्वप्रेमी खासदार तेथे येऊन गेले. काशीचा विकास करणे त्यांच्याही मनात होते, पण ते सर्वजण पंतप्रधान नसल्यामुळे काशी विश्वनाथ धाम उपेक्षित राहिले. काशीतल्या गल्ल्या, बोळ, व्यापारीवर्ग यामुळे विकास अडकून पडला. जगभरातील भक्त त्या गल्लीबोळांतून धडपडत मंदिरापर्यंत कसेबसे पोहोचत होते. रस्त्यांचे रुंदीकरणही करता येत नव्हते. पण मोदी काशीचे खासदार झाल्यापासून कामांना गती मिळाली. अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. विरोध करणाऱ्यांना मोडून काढले गेले. त्यामुळेच काशीचे मंदिर भव्य स्वरूपात जगासमोर आले. या प्रकल्पाचे भव्य स्वरूप राजकारणाचा, राजकीय विरोधाचा चष्मा उतरवून पाहायला हवे. देशातील प्रत्येक गौरवशाली धार्मिक प्रतीके, ऐतिहासिक स्थळांचा जीर्णोद्धार अशा पद्धतीने व्हावा. पंतप्रधानांनी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे मनावर घेतले. महात्मा गांधींची तीच भावना होती. पण अंगावर राख फासून, भगवी वस्त्रे परिधान करून, कपाळास भस्म लावून राज्यकर्त्यांना मंदिरे उभारता येतील, पण राष्ट्र घडवता येणार नाही. मंदिरे किंवा धार्मिक स्थळे ही अध्यात्माची ऊर्जा केंद्रे आहेत. धर्म म्हणजे अफूची गोळी हे सत्य आहे. त्यामुळे फक्त 'अफू' वाटून लोकांना त्यांचे मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. ज्या तत्परतेने काशीचा विकास घडवून आणला तीच तत्परता

लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी

दाखवायला हवी. महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर काशीचे भव्य मंदिर हा उतारा नाही. मथुरेत मंदिरांचे आंदोलन सुरू करून बेरोजगारी कमी होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. मंदिरांचा जीर्णोद्धार हा वेगळा विषय. ज्या गंगेच्या पात्रात पंतप्रधान मोदी यांनी काल डुबकी मारली त्याच गंगेत कोरोना काळात हजारो बेवारस 'प्रेते' वाहताना जगाने पाहिले. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर काशीचे खासदार म्हणून मोदी यांनी त्या वेळी तेथे जायला हवे होते. मोदी आजच्या झगमगाटी वातावरणात तेथे गेले, पण गंगा आक्रोश करीत असताना काशीचे खासदार तेथे गेले नाहीत. हिंदुस्थानास मांगल्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि अध्यात्माचा महान वारसा लाभला आहे. शतकापासून या भूमीने महान संस्कृतीचा प्रवाह खळखळत ठेवला आहे आणि 'वसुधैव कुटुंबकम'च्या संकल्पातून संपूर्ण जगाच्या कल्याणाचा संदेश दिला आहे. आमच्या संस्कृतीची मुळे इतकी घट्ट रुजली आहेत की, अनेक वादळे, हल्लेदेखील ही मुळे नष्ट करू शकले नाहीत. या मुळांतून आपल्या संस्कृतीचा वृक्ष बहरला आहे. देशात आज राजकीय वातावरण बिघडले आहे. राज्यकर्त्यांची मनमानी सुरू आहे. गोंधळाची स्थिती आहे. महामारीने लोकांचे जीवन अशांत केले आहे. अशा वेळी धर्म आणि अध्यात्मच जगण्याची ऊर्जा देत असते. पंतप्रधान मोदींनी काशीत जाऊन गंगेत स्नान केले. त्या गंगास्नानाने त्यांच्या मनाची जळमटे दूर होवोत. विरोधकांविषयीची किल्मिषे नष्ट होवोत आणि काशी विश्वनाथ मंदिराप्रमाणेच लोकशाहीच्या मंदिराचाही जीर्णोद्धार होवो. मोदी हे पंतप्रधान असल्यामुळेच त्यांचे गंगास्नान प्रकाशझोतात राहिले. नाहीतर गंगेत रोज लाखो लोक डुबक्या मारीतच असतात. श्री. राहुल गांधी म्हणतात, तेच खरे. इतके लोक गंगेत स्नान करतात, पण कॅमेरा फक्त मोदींवरच! हा कॅमेरा व्यक्तीवर नसून पंतप्रधानांवर आहे. पाहू, काशी विश्वनाथाच्या मनात काय आहे?

Last Updated :Dec 15, 2021, 9:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.