ETV Bharat / city

रिक्षाचालक महिलेला भाड्यावरून प्रवाशांची मारहाण; चित्रा वाघ यांनी घेतली भेट

author img

By

Published : Jul 16, 2021, 3:17 PM IST

अबोली रिक्षाचालक संघटना
अबोली रिक्षाचालक संघटना

मंगळवारी मारहाण झालेल्या महिला रिक्षाचालक सविता बेले यांना झालेल्या जबरी मारहाणीमुळे त्यांना नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चित्रा वाघ या महिलेची भेट घेऊ शकल्या नाही.

नवी मुंबई - मीटर प्रमाणे पैसे आकारल्याने नवी मुंबईतील अबोली रिक्षाचालक महिलेला रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी नेरूळमध्ये घडली आहे. संबंधित महिला ही सीबीडी बेलापूर मधून नेरूळ सेक्टर 10 येथे रिक्षामधून प्रवासी घेऊन येत होती. मात्र उतरताना झालेल्या प्रवासी भाड्याच्या वादातून महिलेला चक्क प्रवाशांनी मारहाण केली. याप्रकरणामुळे अबोली रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ या मारहाण झालेल्या महिलेच्या भेटीस आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संबधित महिलेला झालेली मारहाण ही अंत्यत दुर्दैवी असल्याचे म्हटले.

रिक्षाचालक महिलेला भाड्यावरून प्रवाशांची मारहाण

काय आहे प्रकरण -

नवी मुंबईत अबोली रिक्षाचालक संघटना आहे. त्यामध्ये केवळ महिलाच रिक्षाचालक असतात. महिला रिक्षाचालक सविता बेले या सीबीडी बेलापूर येथे रिक्षा घेऊन भाड्यासाठी मंगळवारी प्रवाशांची वाट पाहत होत्या. त्याचवेळी स्टँडवर पती-पत्नी त्यांचा मुलगा व मुलगी अशा चार व्यक्ती आल्या व त्यांनी सविता यांना भाड्यासाठी विचारणा केली. सविता यांनी एका वेळी तीनच व्यक्ती रिक्षात बसू शकतात चार नाही असे समजावले. मात्र आपण एकाच कुटुंबातील असून, तीन व्यक्ती एका रिक्षातून गेलो तर उर्वरित एका व्यक्तीला दुसरी रिक्षा करावी लागेल. त्यामुळे आम्हाला एकाच रिक्षातून न्या, अशी विनवणी या कुटुंबाने अबोली रिक्षाचालक सविता बेले यांना केली. हे कुटुंब नेरूळ सेक्टर 10 येथे पोहोचल्यावर सविता बेले यांनी मीटरप्रमाणे 75 रुपये झाल्याचे सांगितले. मात्र आम्ही नेहमी पन्नास रुपये देतो असे म्हणत सविता यांच्याशी संबंधित कुटुंबाने वादविवाद करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या कुटुंबातील मुलीने सविता यांच्या रिक्षाची चावी काढून घेतली. चावी घेतल्यावर मात्र सविता यांनी विरोध केला असता या कुटुंबांतील चारही सदस्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप सविता बेले यांनी केला आहे. ही मारहाण इतकी जबर होती की, बेले यांना वाशी येथील महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

महिलेला मारहाण होणं अंत्यत दुर्दैवी -

याप्रकरणाची दखल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली व मारहाण झालेल्या महिलेची भेट घेण्यासाठी त्या नवी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महिलांना अशा प्रकारची मारहाण होणे अत्यंत वेदनादायक व दुर्दैवी असल्याचे म्हटले. या प्रकरणामुळे अबोली रिक्षाचालक महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे देखील म्हणाल्या. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने धोरणं आखले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

मारहाण करणाऱ्या प्रवाशांना अटक -

रिक्षाचे भाडे देण्याच्या वादातून अबोली रिक्षाचालक महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी संबंधित कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली. तर चौथ्या व्यक्तीला लवकरच अटक करण्यात येईल, असे नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले.

सविता बेले यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह-

मंगळवारी मारहाण झालेल्या महिला रिक्षाचालक सविता बेले यांना झालेल्या जबरी मारहाणीमुळे त्यांना नवी मुंबई मनपाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चित्रा वाघ या महिलेची भेट घेऊ शकल्या नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.