ETV Bharat / city

Mumbai Bank fraud : प्रवीण दरेकरांना भाजपनेच आणले अडचणीत, मात्र भाजपात गेल्याने मुंबै बँक घोटाळ्याचा तपास थंडावला

author img

By

Published : Mar 19, 2022, 6:49 PM IST

Updated : Mar 19, 2022, 7:40 PM IST

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

मुंबै बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ( Mumbai Bank fraud ) आरोपी असलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांना भाजपनेच याप्रकरणी अडचणीत आणले ( Pravin Darekar Troubled By BJP ) होते. मात्र दरेकर यांनी भाजपात प्रवेश करताच ( Pravin Darekar Joins BJP ) या प्रकरणाचा तपास थंडावल्याचा इतिहास आहे. याप्रकरणी दरेकरांवर सोमवारपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले ( HC Relief To Pravin Darekar ) आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा याप्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई - मुंबै बँकेच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ( Mumbai Bank fraud ) आरोपी असलेल्या प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाने सोमवार पर्यंत कारवाई करु नये, असे निर्देश दिले ( HC Relief To Pravin Darekar ) आहेत. मात्र, दरेकरांवरील कारवाईचा फार्स भाजपने 2014 मध्ये आवळला ( Pravin Darekar Troubled By BJP ) होता. परंतु दरेकर यांनी भाजपत प्रवेश केला ( Pravin Darekar Joins BJP ) आणि तत्कालीन सत्ताधारी फडणवीस सरकारच्या काळात या गुन्ह्याचा तपास थंडावला. असे असले तरी बॅंक घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत भाजपनेच दरेकर यांना गोत्यात आणल्याचे बोलले जात आहे.

2015 मध्ये गुन्हा दाखल

मुंबै बॅंकेतील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या कर्ज योजनेतून अनेक सभासदांच्या नावावर परस्पर कर्ज प्रकरणे केली. यासोबत पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना बेकायदा कर्ज मंजूरी दिली. अन् त्याही पुढे जाऊन अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना कर्ज मंजूर करून कोट्यवधी रुपयांची अफरातफर करत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. 1998 पासून 123 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सन 2015 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.

सोडचिठ्ठीने कारवाई थंडावली

सन 2014 मध्ये राज्यात भाजप सत्तेवर आले. प्रवीण दरेकर यांच्या बॅंक गैरव्यवहाराचा मुद्दा भाजप नेत्यांनी उचलून धरला. विनोद तावडे, आशिष शेलार त्यावेळी यासाठी आग्रही होते. तसेच दरेकर यांना अटक करण्याची मागणी करत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत कोट्यावधीचा घोटाळा मुंबै बँकेत झाला, असून सहकार कायद्याचे दरेकर यांनी उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश होते. मात्र, घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अन् कारवाईचा ससेमिरा थंडावला. शिवाय, तक्रारदार विवेकानंद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा मागे घेतला होता.

'मजूर' च्या नावे फसवणूक

मुंबै बँकेवर संचालक म्हणून प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. 1997 पासून दरेकर मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी करत दरेकरांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. अखेर आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांची फिर्याद नोंदवून घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरेकरांना भाजपनेच आणले गोत्यात

भाजपचे नेते दरेकर यांच्या बॅंक गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अटक पूर्व जामिनासाठी दरेकर न्यायालयाचे उंबिरठे झिजवत आहेत. तर महाविकास आघाडी सरकार दरेकरांवर सुडबुध्दीने कारवाई करत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील सरकारच्या निषेधार्थ गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्यात आले. मात्र, दरेकरांच्या मुंबै बँक घोटाळ्याचा मुद्दा भाजपने सुरुवातीच्या काळात चव्हाट्यावर आणून दरेकर यांना गोत्यात आणल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजप नेत्यांना विसर पडलाय का?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मनसेत होते. तेव्हा मुंबै बॅंकेतील आरोपावरुन आरोप झाले होते. भाजपच्या नेत्यांनी हे आरोप केले होते. या आरोपावरून दरेकर यांना घेरले होते. कालांतराने दरेकर भाजपमध्ये गेले. तिकडे नवीन असताना, महत्वाचे पद मिळाले. आज भाजपचे नेते त्यांच्या मागे उभे राहिले असून त्यांची पाठराखण करताना दिसत आहेत. एकेकाळी दरेकरांवर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना याचा विसर पडलेला दिसतो आहे, असे राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी सांगितले.

Last Updated :Mar 19, 2022, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.