गणेशोत्सवात मुंबई मनपाची नवी नियमावली, माझं घर माझा गणपती धोरण राबवण्याचे आवाहन

author img

By

Published : Sep 10, 2021, 3:23 AM IST

गणराया

यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव कोरोनाच्या नियमाचे पालन करून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तर "माझं घर माझा गणपती", "माझं मंडळ माझा गणपती" उपक्रम राबवून मुंबईकरांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यास सहकार्य करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबई - मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव कोरोनाच्या नियमाचे पालन करून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. तर "माझं घर माझा गणपती", "माझं मंडळ माझा गणपती" उपक्रम राबवून मुंबईकरांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यास सहकार्य करावे असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

गणेशोत्सवावर निर्बंध

मुंबईत सुमारे २ लाख घरगुती गणपती तर सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. मुंबईत अकरा दिवस गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्य़ान गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे.

गणेशमूर्तींसाठी नियम

यंदा घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपात करता येणार नाही. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा. शक्‍यतो या व्यक्तिंनी कोविड लसीकरणाचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत. तसेच, गणेशाची मूर्ती ही घरगुती उत्‍सवासाठी २ फूटांपेक्षा जास्‍त उंचीची नसावी, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोकांना परवानगी नसेल. जे उपस्थित असतील त्यांना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. गणेशाची मूर्ती सार्वजनिक उत्‍सवासाठी ४ फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये असेही प्रशासनाने मंडळांना आवाहन केले आहे.

मूखदर्शन घेण्यास मनाई -

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता भाविकांना मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे. गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे आदींद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी असे प्रशासनाने मंडळांना निर्देश दिले आहेत. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार फुले इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी.

७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव -

मुंबई शहरात एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांनी शक्‍यतो कृत्रिम तलावाचा वापर करावा.

गणेशमूर्ती संकलन केंद्रे -

मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

...तर साथरोग कायद्यानुसार कारवाई

मुंबई महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल असे प्रशासनाने म्हटले आहे.

काय आहेत प्रशासनाच्या सूचना?

  • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे. तसे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी घरगुती व सार्वजनिक मंडळांनी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे.
  • घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये.
  • विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. त्यांनी लसीकरणाचे २ डोस घेतलेले व दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेले असावेत.
  • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.
  • लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
  • सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी १० पेक्षा अधिक लोक असणार नाहीत.
  • कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.
  • मंडपात आरती करून १० कार्यकर्त्यांनी विसर्जनाच्या ठिकाणी पालिकेने नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांकडे मूर्ती सुपूर्द करावी. त्यानंतर पालिका कर्मचारी मूर्ती विसर्जित करतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.