ETV Bharat / city

हे पंतप्रधानांचे वक्तव्य समजावे लागेल, जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

author img

By

Published : Aug 24, 2021, 3:02 PM IST

Updated : Aug 24, 2021, 3:18 PM IST

अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत, याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला व देशाला कळली, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई - केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य समजावे लागेल, असा उपरोधक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान'

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असे बोलणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत, याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून राज्याला व देशाला कळली, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

'किती महत्त्व द्यायचे, हे ठरवावे'

राजकारणाचा स्तर खाली गेला आहे, असे नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. अशा पद्धतीने बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व द्यावे, यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपाला उद्धव ठाकरेंचा द्वेष असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने ही भाषा वापरली त्याबद्दल जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.

'चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेऊ नका'

चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेत जाऊ नका. दोन वर्षे ते राजकीय बदल होणार हेच सांगत आहेत. त्यामुळे तुम्हीच तुमचा टीआरपी टिकवायचा असेल तर चंद्रकांत पाटील यांना किती महत्त्व द्यायचे हे ठरवा, अशी विनंती जयंत पाटील यांनी माध्यमांना केली. जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणसे गुद्द्यावर येतात. भाजपाचे मुद्दे संपलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Last Updated :Aug 24, 2021, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.