ETV Bharat / city

'मंदिराची टाळे तोडायला ही मोगलाई आहे का? या तुम्हाला बघूच'

author img

By

Published : Oct 28, 2020, 5:44 PM IST

Updated : Oct 28, 2020, 5:54 PM IST

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुंबईच्या महापौरांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यावरून भाजप आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. १ नोव्हेंबरपर्यंत उघडली नाहीत, तर नाईलाजाने टाळे तोडावी लागतील, असा इशारा भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला. त्यावर मंदिरे तोडण्यासाठी ही मोगलाई आहे का, असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. मंदिरांची टाळे तोडायला या, आम्ही तुम्हाला बघूच असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीकरिता भाजपने राज्यभरात आंदोलने केली. भाजपने दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रे पाठविली आहेत. भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तत्काळ मंदिर उघडण्यासाठी सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केल्याचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले. तसेच 1 नोव्हेंबरचा आधी मंदिरे उघडली नाही तर 1 नोव्हेंबरला मंदिरांचे टाळे आम्ही तोडू, याची कल्पना राज्यपालांना दिली आहे. त्याला सरकार जबाबदार असेल, असे अध्यात्मिक भोसले यांनी सांगितले.

मंदिराची टाळे तोडायला ही मोगलाई आहे का?, या तुम्हाला बघूच

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही दिली प्रतिक्रिया-

यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की राज्यपाल हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत. गोव्याचेही आहेत. भाजपचे जे अध्यात्मिक लोक आहेत, त्यांना असे अध्यात्मिक शिकवितात का? गोव्यात मंदिरे बंद आहेत. त्याठिकाणी जाऊन मंदिरे उघडण्याची मागणी का केली जात नाही. उगाचच बेडक्या फुगवू नका, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री धीराने व संयमाने निर्णय घेत आहेत. आपले कुटुंब या पद्धतीने ते पुढे चालले आहेत. मंदिरे बंद करणे त्यांनाही चांगले वाटत नाही. मात्र, देवळांच्या नावाने राजकारण करत देवळांची टाळे तोडायला आला, तर आम्ही तुम्हाला बघूच असा इशारा त्यांनी दिला.

Last Updated :Oct 28, 2020, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.