ETV Bharat / city

कर्करोग उपचारासाठी जपानने करावे अर्थसहाय्य; आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी

author img

By

Published : Jul 30, 2021, 3:53 AM IST

सह्याद्री अतिथीगृहावर जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची गुरुवारी भेट घेतली.

mumbai
mumbai

मुंबई - राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी जपानने सहकार्य करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी या सुक्ता यांच्याकडे केली. सह्याद्री अतिथीगृहावर जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. यासुक्ता यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची गुरुवारी भेट घेतली. आरोग्य विभागाच्या सचिव केरेकट्टा यावेळी उपस्थित होत्या.

रुग्णालय उभारणीसाठी अर्थसहाय्य मिळावे -

महाराष्ट्र आणि जपानचे नेहमीच सहकार्याचे संबंध राहीले आहेत. पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या विकासकामांसाठी जपान सरकारच्या 'जायका' संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामध्ये मुंबईतील मेट्रो सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी 'जायका'कडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल. राज्य कामगार आरोग्य विभागाच्या वरळी आणि मुलुंड येथील जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणीसाठी देखील जायकाकडून आर्थिक सहाय्य मिळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जपानी नागरिकांचे लसीकरण करु -

कर्करोग उपचारासाठी रेडीएशन थेरपी उपचाराकरीता यंत्रणा उभारणीसाठी जपान कडून तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्य उपलब्ध करून देतानाच जालना येथे कर्करोग उपचार रुग्णालय उभारणीकरीता सहकार्य करावे, अशी मागणी केली. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जपान मधील परिस्थिती, लसीकरणाची स्थिती, लॉकडाऊन, आरोग्य सुविधा याबाबत माहिती जाणून घेतली. महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या जपानी नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी जपानच्या वाणिज्य दूतांना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.