ETV Bharat / city

मी एकटा लढतोय.. अस्वस्थ सरनाईकांनी आपल्या भावनांना वाट केली मोकळी

author img

By

Published : Jul 5, 2021, 5:18 PM IST

Pratap Sarnaik
Pratap Sarnaik

पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी प्रताप सरनाईक सभागृहात हजर होते. प्रताप सरनाईक आज सभागृहात आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी सरनाईक यांना घेरले आणि त्यांच्या पत्राविषयी त्यांना प्रश्न केले. त्यावेळी सध्या आपण एकटे पडलोय व एकाकी लढतोय अशी भावना व्यक्त केली. त्याचबरोबर पक्ष व सरकारने अडचणीच्या काळात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे होते मात्र तसे झाले नसल्याची खंत सरनाईक यांनी व्यक्त केली.

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक मागच्या काही दिवसांपासून कुठे होते ? हे कुणालाच माहीत नव्हते. मात्र आज पावसाळी अधिवेशनात प्रताप सरनाईक सभागृहात हजर झाले. प्रताप सरनाईक आज सभागृहात आल्यानंतर प्रसार माध्यमांनी सरनाईक यांना घेरले आणि त्यांच्या पत्राविषयी त्यांना प्रश्न केले. महत्त्वाचे म्हणजे कालच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रुत्त्व नाही आमचे फक्त वैचारिक मतभेद आहेत, असे म्हटलं होतं. या संदर्भात प्रश्न विचारला असता सरनाईक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आपण एकटं पडल्याची खंत प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली.

प्रताप सरनाईक यांचे पत्र -

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सोबत जुळवून घ्यावं, असं म्हटले होते. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचे काम केले जात असल्याचे देखील म्हटले. मात्र महत्त्वाचा मुद्दा या पत्रातील असा होता की, शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजप सोबत जुळवून घेण्याची मागणी केली गेली. प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र ईडी चौकशांच्या फेऱ्यात आहेत. या पत्रात त्यांनी या तपास यंत्रणेकडून होणाऱ्या त्रासाचा देखील उल्लेख केला होता.

हे ही वाचा - फादर स्टॅन स्वामी यांचे निधन, २० मिनिटांच्या चौकशीनंतर झाली होती अटक


मी एकटा पडलो..


प्रताप सरनाईक यांनी आज प्रसारमाध्यमांना आपल्याबद्दल जे घडलं याचा पाढा वाचला. यावेळी मी एकटा लढतोय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचा मी सदस्य असल्याने आघाडीने माझ्यामागे खंबीर उभे रहावं असं मला वाटत होतं. मात्र तसं काही होताना मला दिसत नाही. माझ्या कुटुंबात या काळात वैद्यकीय समस्या निर्माण झाल्या. मला आर्थिक पाठबळ नको, मी त्यासाठी खंबीर आहे. मात्र सहानभूती म्हणून पक्षाने आणि सरकारने मागे उभे राहिलं पाहिजे होतं, असं वाटत होतं. त्यामुळं मी माझ्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे कळवल्या होत्या. महाभारतात अर्जूनामागे श्रीकृष्ण उभे होते. मात्र या युद्धात मी एकटाच लढतोय, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

हे ही वाचा - भाजपाचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबित; विधानसभा अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण

मी अनेकांना मदत केली..

सुरुवातीच्या काळात मी राष्ट्रवादी पक्षात होतो. माझी कारकिर्द एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत झाली. तेव्हा आमचा उमेदीचा काळ होता. तेव्हा माझा आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष वेगळा होता. मात्र पक्षभेद बाजूला सारुन आम्ही एकमेकांच्या मदतीला धावलो होतो. एकनाथ शिंदे एका प्रकरणात अडचणीत होते. तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांना भेटून आपण एकनाथ शिंदे यांच्या मदतीला धावलो होतो. अडचणीच्या काळात एकमेकांच्या पाठिशी उभे राहिलं पाहिजे ही माझी तेव्हापासूनची भावना आहे. मात्र आता मी अडचणीत असताना मला वेगळा अनुभव येतोय. माझ्या भावना मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या असल्याचे प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवले. मात्र मी कोणावरही नाराज नाही. मी माझा लढा लढणार आहे. मी शिवसैनिक आहे. माझ्या पक्षात अखंडपणे काम करत राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.