ETV Bharat / city

कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने देश अग्रेसर - राज्यपाल

author img

By

Published : Nov 4, 2020, 8:05 PM IST

मुंबई
मुंबई

डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक व परोपकारी व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबई - जर्मनी, फ्रान्स यासह काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून काही भागात नव्याने टाळेबंदी जाहीर झाली आहे. मात्र डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक व परोपकारी व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

धारावी तसेच इतरत्र येथे कोरोना प्रकोपाच्या काळात समाजकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भामला फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवा हा शब्द बोलण्यास अतिशय सोपा आहे; परंतु सेवा करणे अतिशय कठीण आहे. मात्र, भारतातील डॉक्टर्स, परिचारिका व इतर समाजसेवकांनी कोरोना काळात समाजाच्या रुपाने आपण प्रत्यक्ष भगवंताची सेवा करीत आहोत, या भावनेने कार्य केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘धारावी कोरोना नियंत्रण : लोकसहभागाचे उदाहरण’

धारावी येथील कोरोनाची बिकट स्थिती सामूहिक प्रयत्नांतून नियंत्रणात आणल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबई महानगर पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शासन कार्यासोबतच लोकसहभाग तसेच अशासकीय संस्थांच्या योगदानामुळे धारावी येथील कोरोना संसर्ग नियंत्रित करणे शक्य झाले, असे दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार

उदयपूरचे युवराज लक्ष्यराज सिंह मेवाड, बांधकाम व्यावसायिक तसेच शिक्षण संस्थाचालक निरंजन हिरानंदानी, पार्श्वगायक शान व गायिका पलक मुच्छल, अभिनेते अली फजल व भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नानावटी रुग्णालयाचे डॉ. समद अन्सारी, हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ. सुजित चटर्जी, विजय कारिया, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कमल खुशलानी, विनीत गौतम, त्रिवनकुमार कर्नानी, रोमांचक अरोरा, निक्सन जोसफ, नेल्सन कोएल्हो, बैद्यनाथचे आयुर्वेदचे अध्यक्ष सिद्धेश शर्मा, आर.डी नॅशनल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, समाजसेवी एहसान गडावाला, अनुराग कत्रियार, धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नागरे यांच्या यावेळी कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.