ETV Bharat / city

MAHA VIDHAN SABHA : स्वतंत्र महाराष्ट्राची पहिली निवडणूक.. तीन मुख्यमंत्री अन् शिवसेनेचा उदय

author img

By

Published : Sep 23, 2019, 5:29 AM IST

Updated : Oct 5, 2019, 2:57 PM IST

झरोका

महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचा बिगुल वाजला असून दिवाळीपूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. संपूर्ण राज्यभर निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्राने अनेक चढउतार पाहिले आहेत. १९६० मधील पहिल्या विधानसभेपासून ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या १४ व्या विधानसभा निवडणुकीपर्यंतचा राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही अनेक वळणांनी झाला आहे. राज्याच्या मंगल कलशानंतर एकंदर वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा धांडोळा आपण घेणार आहोत ‘झरोका’ या १४ लेखांच्या विशेष लेखमालिकेतून..

मुंबई - महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाणांनी बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केली. शे.का.प, प्रजा समाजवादी. साम्यवादी पक्षातील तरुण मराठा नेत्यांना काँग्रेसमध्ये आणले. राज्यात १९६१ मध्ये पंचायत राज कायदा लागू झाल्यानंतर या नेत्यांचे पुनर्वसन करणे काँग्रेसला सोपे गेले. पुरोगामी धोरणामुळे अनेक दलित गट काँग्रेसमध्ये विलीन झाले. शेकापचे अनेक आमदार, खासदार व अन्य नेते काँग्रेसमध्ये गेल्याने १९६२ मध्ये शेकाप १५ जागेपर्यंत घसरला.

independent maharastra
स्वतंत्र भाषिक महाराष्ट्राच्या नकाशा अनावरण प्रसंगी पंडित नेहरू व यशवंत राव चव्हाण.

नवनिर्मित मराठी भाषिक राज्य महाराष्ट्राच्या पहिल्या वैधानिक विधानसभेचे गठन करण्यासाठी १९६२ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच महाराष्ट्र विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. १९६२ च्या निवडणुका या लोकसभेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. या निवडणुकीसोबत २६४ मतदारसंघात १९ फेब्रुवारी १९६२ रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान घेण्यात आले.

महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेवेळी १ कोटी ९३ लाख ९५ हजार ७९५ इतके नोंदणीकृत मतदार होते. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ कोटी १ लाख २४ हजार ७५५ तर महिला मतदारांची संख्या होती ९२ लाख ७१ हजार ४०. त्यापैकी ६०.३६ टक्के म्हणजे १ कोटी, १७ लाख ६ हजार ६७४ मतदारांना आपला हक्क बजावला होता. २६४ जागांसाठी एकूण ११६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी महिला उमेदवारांची संख्या होती केवळ ३६ यातील १३ महिला निवडून पहिल्या विधानसभेच्या सदस्य झाल्या होत्या.

१९६२ च्या पहिल्या निवडणुकीत एकूण २६४ पैकी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांची संख्या होती २१७ त्यानंतर अनुसुचित जाती ३३ व अनुसुचित जमाती प्रवर्गातून १४ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ७४ हजार ३९५ मते बाद ठरविण्यात आली याची टक्केवारी ६.३१ टक्के इतकी होती.

या निवडणुकीत २६४ पैकी तब्बल २१५ जागा जिंकून काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीपासून जनतेच्या मनावर मिळवलेले वर्चस्व कायम राखले. काँग्रेसने मिळवलेल्या मतांची टक्केवारी तब्बल ५१.२२ टक्के इतकी होती. या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पक्षाचे नाव होते शेतकरी कामगार पक्ष आणि यांना मिळालेल्या जागा होत्या १५. शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत मिळवलेल्या मतांची टक्केवारी होती केवळ ७.४७ टक्के. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला 9, कम्युनिस्ट पक्षाला 6, रिपब्लिकन पार्टीला 3 आणि समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली. या विधानसभेत 15 अपक्षही निवडून आले होते.

या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली. बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते.

मुख्यमंत्रीपदी यशवंतराव विराजमान न होता या तीन जणांना मिळाली संधी -

संयुक्त महाराष्ट्र चळवळीला व मराठी भाषिक स्वतंत्र राज्याला काँग्रेस व पंतप्रधान पंडित नेहरूंचा विरोध होता. त्यामुळे राज्यातील जनमत काँग्रेस विरोधात गेले होते. मात्र यशवंतराव चव्हाणांनी वेगळ्या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला व त्यानंतर पुढच्या दोन वर्षात प्रतिकूल झालेले जनमत काँग्रेससाठी अनुकूल बनले. काँग्रेसची धोरणे बहुजनांपर्यंत घेऊन जाण्यात व सत्तेचा पट ब्राम्हणेतरांकडे खेचण्यात यशवंतराव यशस्वी झाले. परिणामी राज्यात काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेत आली. परंतु या विजयाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना राज्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली नाही.

three cm
कन्नमवार, पी.के. सावंत व वसंतराव नाईक

1960 नंतर झालेल्या या बदलांमुळे 1957 मध्ये मुसंडी मारणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र समिती व अन्य काँग्रेसेतर पक्षांना आपला जनाधार वाढवणे शक्य झाले नाही. मराठा-कुणबी जातसमूह केंद्रीत बहुजन समाजाचे राजकारण 1960 मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाले आणि त्यातूनच काँग्रेसला राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व कायम ठेवता आले.

१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले व नेहरुंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावून घेतले. त्यामुळे विदर्भातील ज्येष्ठ नेते मारोतराव कन्नमवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. कन्नमवार चंद्रपूर जिल्ह्यातील सावळी या मतदारसंघातून निवडून आले होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले ते पहिलेच विदर्भाचे नेते होते. मात्र २४ नोव्हेंबर १९६३ रोजी कन्नमवार यांचे मुख्यमंत्री असतानाच निधन झाले व वर्षाच्या आतच नवीन मुख्यमंत्री शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली. त्यानंतर कोकणातील नेते पी.के. सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र केवळ १० दिवस मुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर सावंत यांना पायउतार व्हावे लागले. ४ डिसेंबर १९६३ रोजी विदर्भाचे बंजारा नेते वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली.

वसंतराव नाईक हे तब्बल ११ वर्षे ७७ दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम अजूनही नाईक यांच्या नावावर अबाधित आहे. राज्याच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच मुख्यमंत्र्यांना आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. एक म्हणजे वसंतराव नाईक व दुसरे देवेंद्र फडणवीस आणि विशेष म्हणजे दोघेही विदर्भातील नेते आहेत.

पहिल्या विधानसभेतील असे सदस्य ज्यांनी पुढे महाराष्ट्र घडविला -
महाराष्ट्र निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत असे नेते निवडून आले ज्यांनी पुढे जाऊन नव्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये बॅरिस्टर ए.आर. अंतुले, शंकरराव चव्हाण आदि नेते पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर आचार्य अत्रे, सरोजिनी बाबर आदि पहिल्य विधानसभेचे सदस्य होते.

शेतकरी, कामगार व वंचित घटकांच्या प्रश्नांवर तळमळीने बोलणारे व विधानसभा प्रतिनिधित्वाचा विक्रम करणारे सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचीही ही पहिलीच निवडणूक होती. राज्याच्या स्थापनेपासून प्रत्येक घडामोडींचा साक्षीदार राहिलेले व एक स्वच्छ राजकारणी म्हणून परिचीत असलेले गणपतराव देशमुखांनी सांगोला (जि. सोलापूर) मतदारसंघातून ११ वेळा निवडून जाण्याचा विक्रम केला आहे. १३ व्या विधानसभेत सर्वात वयोवृद्ध (९३ वर्षे) आमदारही देशमुख होते. देशमुख यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या १४ व्या विधानसभेत हा नितळ राजकारणी दिसणार नाही. देशमुख यांनी एकूण १३ निवडणुका लढविल्या. त्यात त्यांना १९७२ व १९९५ या दोन निवडणुकांत पराभवही पत्करावा लागला.

देशमुख यांच्याप्रमाणे शेकापचे कृष्णराव धुळपही पहिल्या विधानसभेत होते. त्यांनी दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठं योगदान असणारे रत्नाप्पाणा कुंभार, विदर्भाचे सिंह म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे, मुंबईचं वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावे आहे ते शेषराव वानखेडे असे अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे सदस्य या विधानसभेत होते.

दुसरी विधानसभा १९६२ ते १९६७ महत्वाचे निर्णय -

  • कापुस एकाधिकार खरेदी योजना.
  • ओझरचा मिग विमान प्रकल्प.
  • वसंतराव नाईकाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात धवलक्रांती व दुग्धक्रांती
  • दारूबंदी उठवून महसूल वाढवले.
  • पैठण येथे पहिले खुले कारागृह.
  • पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर जाहीर फाशी घेईन असे ते १९६५ मध्ये जाहीर सभांमध्ये म्हणाले होते व त्यांनी म्हटल्याप्रमाणे राज्य धान्यउत्पादनात अग्रेसर करून दाखवले.
  • मटका, जुगार यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू केली.

बाळासाहेब ठाकरेंचा उदय व शिवसेनेचे जन्म -
या पाच वर्षातील ठळक घडामोड म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वाढते प्रस्त. मुंबईतील जनतेवर बाळासाहेबांनी गारूड निर्माण केले होते. १९६० मध्ये महाराष्ट्राची स्थापणा झाल्यानंतर मुंबईमध्ये गुजराती भाषिक बहुसंख्येने होते. त्याबरोबर काही मराठी मुलुख कर्नाटकात गेला होता. मुंबईच्या व्यापारावर व तेथील नोकऱ्यांवर दक्षिणी व गुजराती लोकांची मक्तेदारी निर्माण झाली होता. त्यामुळे इथल्या मराठी माणसांमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती.

shiv sena
शिवसेनेचा उदय

बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या मार्मिक साप्ताहिकातून नेमक्या या भावनेला हात घातला. यातून त्यांनी मराठी माणसांचा आवाज उठवला. ८० टक्के नोकऱ्या मराठी मुलांना देण्यात आल्या पाहिजेत, मराठी लोक उद्योग-व्यवसायात पुढे आला पाहिजे अशा मागण्या ठाकरे यांनी जाहीर आंदोलनातून केल्या. पुढे १९ जून १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रादेशिक राजकीय पक्ष ठरला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक व बाळासाहेब ठाकरे यांच्यातील स्नेह वाढत जाऊन नाईक यांनी शिवसेनेच्या अनेक हिंसक कृत्यांकडे कानाडोळा केला. त्यामुळे काहीजण शिवसेनेला उपरोधाना वसंत सेना असेही म्हणत असत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated :Oct 5, 2019, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.