ETV Bharat / city

कितीही छळ करा; मी घाबरणारा किंवा झुकणारा नाही, एकनाथ खडसे भाजपवर बरसले

author img

By

Published : Aug 30, 2021, 6:32 PM IST

Updated : Aug 30, 2021, 6:52 PM IST

Eknath Khadse
Eknath Khadse

नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा माणूस नाही. जे होईल ते होईल, अशी मानसिकता मी आता करून घेतली आहे. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. ईडी माझ्या मागे लागली म्हणून माझा चेहरा पण पडणारा नाही.

जळगाव - नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा माणूस नाही. जे होईल ते होईल, अशी मानसिकता मी आता करून घेतली आहे. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. ईडी माझ्या मागे लागली म्हणून माझा चेहरा पण पडणारा नाही. 'चलते रहना' असा माझा स्वभाव आहे. तुम्ही माझी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खडसे बोलत होते. यावेळी खडसेंनी भोसरीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या मुद्द्यावरून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. या बैठकीला माजीमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कार्यकर्ता बैठकीत बोलताना
शेरोशायरीत रंगले खडसे -
यावेळी बोलताना खडसेंनी शेरोशायरी करत भाजपला टोले लगावले. ते म्हणाले, 'जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है', असा शेर बोलून दाखवून खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला. ते पुढे म्हणाले, ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकश्या झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण 'मी पुन्हा येईन', असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी 'चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के', हा शेरही म्हणून दाखवला.
जावयाला तरी त्रास द्यायला नको होता -
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली हे मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता. माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात काही केले नाही. गेली 20 वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त 2 कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता यांना माफ करणार नाही. योग्य वेळी जनता उत्तर देईल. एखाद्या निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मलाच नाही तर कोणालाही आवडणार नाही, असेही ते म्हणाले.
खडसेंकडूनही स्वबळाचा नारा-
तीन पक्षांचे सरकार असल्याने कामे होतं नाहीत. पुढच्या वेळेस राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणा' असे वक्तव्यही एकनाथ खडसे यांनी केले. जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलवर एकमत झाले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही कार्यकर्त्यांनी तयार असले पाहिजे असेही खडसे शेवटी म्हणाले.
मी चांगल्या लोकांमध्ये आलो, याचे समाधान-
यावेळी खडसेंनी राष्ट्रवादी परिवाराचे कौतुक केले. भाजप सोडल्यानंतर मी चांगल्या लोकांमध्ये आलोय, याचे समाधान आहे. याठिकाणी सर्व जण सुख-दुःखात साथ देतात, भाजपमध्ये असे होत नव्हते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खडसेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. मुंडे साहेब माझी नेहमी विचारपूस करायचे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र -
एकनाथ खडसे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या. आमच्या वेळी खूप मेहनत घ्यावी लागत होती. आता तुम्हाला व्यासपीठ उपलब्ध आहे. नव्यांना आपल्यात सामावून घ्या, पदाची अपेक्षा न बाळगता निष्ठेने काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.
Last Updated :Aug 30, 2021, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.