ETV Bharat / city

आमदार निधीवाटप वाद : अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदारही नाराज

author img

By

Published : Apr 7, 2022, 3:58 PM IST

काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार निधी मिळत नसल्याबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे आमदारही निधी मिळत नसल्याने नाराज असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत दिली. त्यामुळे निधी वाटपावरुन महाविकास आघाडीत वाद उफाळून आला आहे.

Deputy Cm Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार निधी मिळत नसल्याबाबतची नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. मात्र शिवसेना आणि काँग्रेस नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील निधी मिळत नसल्यामुळे नाराज असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीतील सगळेच आमदार नाराज असल्याचे उघड झाले आहे. प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, की गेली दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे सावट होते. या परिस्थितीमुळे राज्यात निधीची कमतरता होती. त्यामुळेच आमदारांना निधी वाटपात हात आखडता ठेवावा लागल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निधी वाटपाबाबत नाराजी केवळ शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारातच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देखील नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाऊड स्पीकर मुद्यावर गृहमंत्र्यांशी करणार चर्चा - मनसे आणि भारतीय जनता पक्षाकडून मशिदीवर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरचा मुद्दा समोर आणला जात आहे. या मुद्द्याबाबत आपण लवकरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. लाऊड स्पीकरबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर सर्वांनीच राखला पाहिजे, असा सल्लाही अजित पवारांनी यावेळी दिला.

फुकट सेवांचा राज्यावर बोजा, अजित पवारांचा नाव न घेता अरविंद केजरीवालांना टोला - काही राज्यांमध्ये वीज, पाणी अशा सेवा राज्य सरकारकडून मोफत दिल्या जात आहेत. मात्र मोफत दिलेल्या सेवांमुळे राज्य सरकारवर आर्थिक बोजा येतो. या आर्थिक बोजामुळे राज्याची विकास कामे होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. सध्या दिल्ली आणि त्यानंतर पंजाब राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर अशा सेवा लोकांना दिल्या जात आहेत. याबाबत बोट ठेवत अजित पवारांनी नाव न घेता अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला.

वेट कमी करून गॅसच्या दरात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. मात्र दिवसेंदिवस इंधनाचे आणि गॅसचे दर वाढतच चालले आहेत. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.