अडेलतट्टूपणे वागल्या तर विमा कंपन्यांवर गुन्हेच दाखल करणार - अजित पवार

author img

By

Published : Oct 21, 2021, 4:53 PM IST

अजित पवार

राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई - शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमा कंपन्यांना दिला आहे. मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विमा कंपन्यांना हा इशारा दिला आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. आम्ही वेडेवाकडे करा, असे काही सांगत नाहीत, पण ज्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला पीक विमा मिळू शकतो. तो, मिळाला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - "बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही बँकेत पीक विमा हप्ता सादर करण्याची सुविधा"

'साखरेचा विक्री दर वाढावा म्हणून भेट घेतली असेल'

राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे एक शिष्टमंडळ घेऊन देशाचे सहकार मंत्री अमित शाह यांच्या भेटीला काल (21 ऑक्टोबर) दिल्लीला गेले होते. काही प्रश्न राज्यस्तरावर सुटत नाहीत. तसेच काही कारखान्यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे. तसेच राज्यात सध्या साखरेला 3100 रुपये दर आहे. मात्र हा दर वाढवून 3500 रुपये करावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने अमित शाह यांची भेट घेतली असावीस असे मत अजित पवार यांनी केले. तसेच अमित शाह यांना भारतीय जनता पार्टीचे जे नेते भेटायला गेले होते त्या सर्व नेत्यांना आपण चांगल्या प्रकारे ओळखतो. राज्यातील साखर उद्योग याबाबत या सर्वांना चांगली माहिती आहे. त्यामुळे राज्याचे हित लक्षात घेऊन त्यांनी शाह यांच्याकडे मागणी केली असेल, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - केळीच्या पीक विम्याचे निकष म्हणजे, शेतकरी उपाशी तर विमा कंपन्या तुपाशी!

'निर्णय घेतानाच विचार करायला हवा'

महाविकास आघाडी सरकारसोबत जाऊन मला पश्चाताप करायची वेळ आली आहे, असे वक्तव्य शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केले. या वक्तव्याचा समाचार घेत अजित पवार यांनी निर्णय घेण्याच्या आधीच विचार करायला हवा. त्यामुळे पश्चाताप करायची वेळ येत नाही, असा टोला राजू शेट्टी यांना लगावला आहे. तसेच अद्याप आपण या विषयावर राजू शेट्टी यांच्याशी बोललेलो नाही. मात्र वेळ मिळतात आपण त्यांच्याशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.