ETV Bharat / city

प्रियंका गांधींच्या संघर्षाने दिल्लीही झोपली नसावी, रोखठोक'मधून राऊतांचा भाजपवर हल्ला

author img

By

Published : Oct 10, 2021, 10:58 AM IST

Updated : Oct 10, 2021, 11:04 AM IST

'प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला. 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा.' असा हल्ला राऊत यांनी आजच्या रोखठोकमधून भाजपवर केला आहे.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्रात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी दिली आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा आरोप असलेला मंत्रीपुत्र आशिष मिश्राला शनिवारी रात्री अटक झाली आहे. मात्र, ही कारवाई आधीच झाली पाहिजे यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या रस्त्यावर उतरल्या होत्या. प्रियंका गांधींच्या संघर्षाने इंदिरा गांधींच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली असून दिल्लीचीही झोप उडाली असेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

झोपी गेलेल्या सरकारची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले

या प्रकरणावर, 'ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आज कुणालाही अटक करत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे,' अशी टीका शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर केली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या या हत्याकांडानंतर रस्त्यावर उतरलेल्या प्रियंका गांधी यांनी या झोपी गेलेल्या सरकारची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले आहे. दरम्यान, इंदिराजींचे अस्तित्व या निमित्ताने पुन्हा दिसले आहे असही शिवसेनेने म्हटले आहे.

'प्रियंका गांधींच्या संघर्षाने देश खडबडून जागा झाला'

'लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. 'मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?' या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते!' असे शिवसेनेने म्हटले आहे.

वाघिणीप्रमाणे जंगलात फिरल्या प्रियंका गांधी

प्रियंका गांधींच्या संघर्षाने देशाला इंदिरा गांधींच्या अस्तित्वाची जाणीव झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 'प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला. 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा.' असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे संजय राऊत यांनी या लेखात म्हटले आहे. बहिणीच्या अटकेने राहुल गांधी चिंतेत नव्हते, तर त्यांना विश्वास आहे की प्रियंका यांच्यात हिंम्मत आहे. हम नही डरेंगे! असे राहुल गांधी म्हणाल्याचा उल्लेख राऊत यांनी केला आहे.

'विरोधी पक्षांची शकले, सगळेच तडजोडवादी बनले'

हाथरस आणि आता लखीमपूर या दोन्ही घटनांमध्ये काँग्रेस आणि विशेषतः प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर येऊन लढा दिला असल्याचे राऊत यांनी लेखात म्हटले आहे. 'राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची शकले झालेली दिसत आहेत. आघाड्या होण्याआधीच अहंकाराच्या सुईने त्या फुटतात. प्रत्येकाला आपल्या राज्याचा सुभा सांभाळायचा आहे व सध्याच्या राजकीय परिस्थितीत दिल्लीचे मांडलिक बनून दिवस ढकलायचे आहेत. इंदिरा गांधी व त्यांची काँग्रेस नको म्हणून 1977 साली विरोधक एकत्र आले व सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते. आज सगळ्यांना एकत्र करणारे जयप्रकाश नारायण नाहीत व लढण्याची प्रेरणा देणारे जॉर्ज फर्नांडिसही नाहीत. सगळेच तडजोडवादी बनले आहेत.' या पार्श्वभूमीवर लखीमपूर खेरीचे प्रकरण, त्यातून निर्माण झालेली प्रियंका नावाची ठिणगीही महत्त्वाची वाटते.' असे राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पहिल्यांदाच भारतीय रेल्वेच्या एसी डब्यांमध्ये चॉकलेटची वाहतूक

Last Updated : Oct 10, 2021, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.