ETV Bharat / city

Controversy Bhagat Singh Koshyari : राज्यपाल यांच्या विधानाचं समर्थन - प्रकाश आंबेडकर; वाचा राजकीय प्रतिक्रिया

author img

By

Published : Jul 30, 2022, 11:17 AM IST

Updated : Jul 30, 2022, 5:41 PM IST

Controversy Bhagat Singh Koshyari
Controversy Bhagat Singh Koshyari

17:40 July 30

राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करतायेत : सुप्रिया सुळे

मुंबई - प्रत्येकाला समान वागणूक देणे ही राज्यपालांची जबाबदारी आहे. राज्यपाल कोश्यारी लोकांमध्ये तेढ आणि फूट निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकं दुखावले आहेत. मी राष्ट्रपतींना राज्यपालांना हटवण्याची विनंती करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


17:39 July 30

राज्यपालांच्या विधानाबाबत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची ट्विटरवर नाराजी

सोलापूर - महाराष्ट्राच्या इतिहासातील राज्यपालाचे सर्वात वाईट विधान आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने शांतताप्रिय समाजात फूट पाडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण माझ्या मते ही आरएसएस आणि भाजपची संस्कृती आहे! असे मत व्यक्त करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांबाबत नाराजी जाहीर केली आहे.आमदार प्रणिती शिंदेनी आपली नाराजगी ही ट्विटरवर जाहीर केली आहे.

15:03 July 30

राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे -; छगन भुजबळ

राज्यपाल यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबईबद्दल हे वक्तव्य अप्रस्तुत असून वाद नको राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज नाशिक येथे पत्रकारांशी छगन भुजबळ यांनी संवाद साधला.त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

15:02 July 30

राज्यपालांना जोडे मारा आंदोलन करून कोल्हापुरी जोडे पाठवणार - जितेंद्र आव्हाड

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्थरावरून कोश्यारी यांच्या विरोधात टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोश्यारी यांचा चांगलाच समाचार घेतला.

14:02 July 30

राज्यपाल यांच्या विधानाचं समर्थन - प्रकाश आंबेडकर

पुणे - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी,सेना आणि भाजप यांचं राज्यात सरकार राहीलं. मुख्यमंत्री देखील याच पक्षांचे राहिले आहेत. अधिकांश मंत्री हे मराठा समाजाचे राहिले आहेत. त्यामुळे यांनी राज्यात राज्य कस केलं यावर केलेलं हे विधान आहे. राज्य जरी मराठ्यांचं असलं तरी आर्थिक सत्ता येथील मराठ्यांच्या हाती नाही. तर ती राजस्थानी आणि गुजराथी लोकांच्या हाती आहे. हे दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना आपलं पितळ उघड पडलं म्हणून राज्यपाल यांची उचलबांगडी करा अस म्हणत आहेत. आम्ही राज्यपाल यांच्या विधानाचं समर्थन करत आहोत, असं यावेळी आंबेडकर म्हणाले.

13:25 July 30

राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

13:00 July 30

महाराष्ट्राचा अपमान कराल तर कोल्हापुरी जोडा दाखवू - उद्धव ठाकरे

राज्यपालांच्या मुंबईवरील विधानावरून महाराष्ट्रात रणकंदन माजले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राचा अपमान कराल तर कोल्हापुरी जोडा दाखवू, असे ठाकरे म्हणाले. राज्यपालांचे हे विधान अनावधानाने आलेले नाही. मराठी माणसाचे रक्त सांडून मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे. मुंबई, महाराष्ट्राबद्दल कोणताही अपशब्द सहन केला जाणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

12:22 July 30

राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये - संदीप देशपांडे

राज्यपालांनी नको त्या गोष्ट्रीत नाक खुपसू नये, गुण्या गोविंदान नांदावं असा सल्ला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. मुंबईची प्रगती आणि महाराष्ट्राची प्रगती इथे राहणाऱ्या मराठी माणसामुळे झालेली आहे. जे बाहेरचे आले, त्यांना मुंबईने सामावून घेतले आहे याचा अर्थ त्यांच्यामुळे मुंबईची प्रगती झाली नाही. मुंबई महाराष्ट्रात आहे राज्यपालांनी पहिले समजून घ्यावं. मराठी माणसामुळेच मुंबई आहे आणि महाराष्ट्र आहे. तिथे काय कोणी बाहेरचे आले आणि त्यांची प्रगती झाल्यामुळे आपली प्रगती झाली नाही, तर महाराष्ट्रामुळे त्यांची प्रगती झालेली आहे असे संदीप देशपांडे म्हणाले.

12:18 July 30

मराठी माणसाला डिवचू नका, राज ठाकरेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी नागरिक काढले तर मुंबई आर्थिक राजधानी राहील का असा सवाल केला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघत आहे. राज्यपालांवर सर्वस्तरातून टीका करण्यात येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. मराठी माणसाला डिवचू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला आहे.

12:08 July 30

मराठी माणसाचा अपमान केला, महाराष्ट्राची माफी मागा - अमोल मिटकरी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनीही समाचार घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. यात त्यांनी 'महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय, महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा' असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

12:02 July 30

हा 105 हुतात्म्यांचा अपमान - संजय राऊत

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे. राज्यपालांच्या मते थोडक्यात काय तर मराठी माणूस भिकारडा आहे. हा 105 हुतात्म्यांचा अपमान असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती, राजस्थानी बाहेर काढले तर मुंबईत पैसाच राहणार नाही, असे विधान केले होते.

11:08 July 30

Controversy Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री लिहिणार केंद्राला पत्र

मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत. प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.

Last Updated :Jul 30, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.