ETV Bharat / city

आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

author img

By

Published : Jun 19, 2021, 7:22 PM IST

Updated : Jun 19, 2021, 10:32 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वबळ हे केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये, आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला गेला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसं जाहीर वक्तव्यसुद्धा माध्यमांमध्ये केलं होतं. या स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला आपल्या भाषणात टोला लगावला आहे.

बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नाऱ्यावरून टार्गेट केलं. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील, असंही ते म्हणाले.

  • कुणाचीही पालखी वाहणार नाही

आम्ही कुणाचीही पालखी वाहणार नाही. सत्तेसाठी लाचार होणार नाही. शिवसेनेचा जन्म न्याय हक्क मिळवून देण्यासाठी झाला आहे. आम्ही भलत्यासलत्याच्या पालख्यांना खांदा देणार नाही. त्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही. पायात फाटके जोडे घालू, पण आम्ही आमच्याच पायांवर खंबीरपणे उभे राहू, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

  • स्वबळाचा नारा आपणही देऊ : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ, ताकद दाखवलीच पाहिजे. आपलं बळ असायलाच हवं. स्वत:चं बळ आणि आत्मविश्वास हवाच. आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलं आहे. मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला. मराठी माणसाला स्वाभिमान दिला. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं. तलवार उचलण्याची ताकद आधी कमवा, मग वार करा. माझ्यासाठी स्वबळ हे आहे. निवडणुका तर होत असतात. जिंकण हरणं होत असतं. पण हरल्यानंतर पराभूत मानसिकता जास्त धोकादायक आहे, असं ते म्हणाले.

Last Updated :Jun 19, 2021, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.