ETV Bharat / city

कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

author img

By

Published : Jun 15, 2021, 8:48 PM IST

Coastal Road
कोस्टल रोडचे काम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड संदर्भात कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी काम वेगाने सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड संदर्भात कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी काम वेगाने सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार नाही याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे मुंबईतील कोस्टल रोड. मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात देखील आऊटफॉल, पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडून आढावा घेऊन व सूचना दिल्या. मुंबई पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही, तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यावेळी उपस्थित होते. प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांनी सादरीकरण केले.

Coastal Road
कोस्टल रोडचे लेआऊट

पाण्याच्या निचऱ्यासाठी ७७ आउटफॉल साफसफाई, पंप्स कार्यान्वित

प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी फेस अशा ठिकाणी एकंदर ७७ आऊटफॉल असून त्यातील ४३ हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व आऊटफॉलची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी याठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप्स बसविण्यात आले आहेत. कोस्टल रोडला लागून १५ ठिकाणी असे ६३ पंप्स आहेत. पावसाळा सुरु झाला असून पाण्याचा निचरा वेळोवेळी होऊन पाणी साचणार नाही तसेच कामातही बाधा येणार नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

कोस्टल रोडचे ३६ टक्के काम पूर्ण

Coastal Road
कोस्टल रोडचे लेआऊट

१०.५८ किमीच्या या सागरी मार्गाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले असून या प्रकल्पावर एकूण १२ हजार ७२१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे दोन मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. १५. ६६ किमीचे इंटरचेंजेस मार्ग देखील असणार आहेत. आत्तापर्यंत बोगदा खणण्याचे काम ९ टक्के, रिक्लेमेशन ९० टक्के, सागरी भिंत ६८ टक्के अशी कामाची प्रगती आहे.

पाणी साचू नये म्हणून मोठ्या भूमिगत टाक्या

हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी- कुर्ला सायन रेल्वे स्थानक परिसर येथे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचून होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर, ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल याविषयीची चित्रफितही दाखविण्यात आली. पुढच्या वर्षीपासून या कामामुळे हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल असेही सांगण्यात आले. यंदा परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाण पुलादरम्यान जोडरस्ता असून दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहिली असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.

Coastal Road
कोस्टल रोडचे काम

गाळ काढण्याच्या कामाचे संगणकीयकरण

९ जून रोजी मुंबईत २० ठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पाउस झाला. तर ११ ठिकाणी १५० मिमी ते २०० मिमी, १३ ठिकाणी १०० मिमी ते १५० मिमी आणि ३ ठिकाणी १०० मिमीपेक्षा कमी पाउस झाला. मुंबईत ३८६ पुराचे पाणी साचण्याची ठिकाणे असून १७१ ठिकाणांवर पाणी साचणार नाही किंवा लगेच निचरा होईल यासाठी उपाययोजना केली असून, जून अखेर इतर ठिकाणांची कामेही पूर्ण होतील. २४ प्रभागात ६ मीटर पेक्षा कमी रुंद नाल्यांची १०० टक्के साफसफाई झाली आहे. नाल्यातून गाळ काढणे व त्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावणे या संपूर्ण प्रक्रियेवर संगणकीय पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते व प्रत्येक वाहनाच्या फेऱ्या, वाहून नेलेला गाळ, वजन याची छायाचित्रांसह व्यवस्थित नोंद ठेवली जाते याविषयी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली.

कसा असणार कोस्टल रोड?

Coastal Road
कोस्टल रोडचे लेआऊट

कोस्टल रोडचा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा आहे. 35.6 किमी लांबीचा कोस्टल रोडची लांबी आहे. समुद्र किनाऱ्यावर भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असणार आहे. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होईल असा अंदाज तंज्ञानाकडून व्यक्त करण्यात आलाय.

कोस्टल रोडची वैशिष्ट-

35.5 किलोमीटरच्या रस्तात साडे सहा किलोमीटरचे बोगदे असणार

आठ लेनची मार्गिका, यामध्ये ४ इंटरचेंज असतील.

या मार्गामुळे 34 टक्के इंधनाची बचत होईल असा अंदाज आहे.

या मार्गावर 1650 वाहन पार्किंगची सोय असणार आहे.

तीन टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचा काम सुरू आहे. नरिमन पॉईंट ते वरळी सि-लिंक असा पहिला टप्पा, वरळी ते बांद्रा सि-लिंक दुसरा टप्पा, तर बांद्रा सी-लिंक ते बोरीवली असा तिसरा टप्पा असणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे कोस्टल रोडचे काम काही काळ रखडलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी काम वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम 2023 मध्ये पूर्ण होईल अशी आशा अधिकाऱ्यांनी या बैठकीत बोलून दाखवली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.