ETV Bharat / city

पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी आम्ही पाहिले.. मग तुम्हाला काय हिजबूल जनता पक्ष म्हणायचे का? उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार

author img

By

Published : Mar 20, 2022, 5:47 PM IST

एमआयएमने दिलेल्या ऑफरवरून शिवसेनेला डिवचणाऱ्या भाजपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला. हिंदुस्थान- पाकिस्तान बस सेवा वाजपेयींनी सुरु केली. इथपासून तर पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथंपर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुमच्या पक्षाला काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार ( Uddhav Thackeray Criticized BJP ) घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - हिंदुस्थान- पाकिस्तान बस सेवा वाजपेयींनी सुरु केली. इथपासून तर पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथंपर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुमच्या पक्षाला काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार ( Uddhav Thackeray Criticized BJP ) घेतला.

राज्यात ठाकरे सरकार येऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. या दोन वर्षात राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तसेच पक्षवाढीसाठी जनतेशी थेट संपर्क करण्यासाठी शिवसेनेकडून 22 ते 25 मार्च दरम्यान "शिव संपर्क अभियान" चा पहिला टप्पा राबवण्यात येणार आहे. संपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा मधील 19 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्षाला खडसावले. तसेच एम आय एम पक्षाच्या प्रस्तावाचा देखील समाचार घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी आम्ही पाहिले.. मग तुम्हाला काय हिजबूल जनता पक्ष म्हणायचे का? उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार

भाजपप्रमाणे बांधणी करायची आहे

मुख्यमंत्री म्हणाले, बरेच दिवसांनी भेटतो आहे, एकाजागी बसून राहावे लागले. मागे बैठक झाली आणि दुसरी लाट आली. त्यानंतर मानेचे दुखणे. परंतु काही दिवसात कानाकोपऱ्यात फिरणार आहे. शिवसंपर्क मोहीम नविन नाही. त्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोचवायचे आहे. युती भाजपने तोडली. त्यांनी बांधणी केली तशी आपल्याला करायची आहे. परंपरागत भाजपकडे काही जागा होत्या. तिथे आपण आता लढू. महिलांना समोर आणा. जिकणारे उमेदवार हवे, सदस्य, मतदार नोंदणी. आता सर्व निवडणुका गांभीर्याने घ्यायच्या आहेत. पंचायत ते पार्लामेंट ही भाजपची निती घातक आहे. त्याला काटशह गरजेचा. अयोध्याला गेलो तेव्हा मी सांगितले आम्ही भाजपला सोडलय, हिंदुत्व नाही. हे राजकारणासाठी हिंदुत्व करताहेत. आपण हिंदुत्वासाठी राजकारणात हा मूळ फरक. जस समोर विरोधक आहेत. त्याच्या कुरापती ओळखा. स्वत: काय केले ते न सांगता आपल्यावर टीका सुरू आहे. उत्तर प्रदेश विजयाचे अवडंबर. असे नाही की भाजपचा दैदीप्यमान विजय झाला. भ्रम निर्माण करुन संमोहन करायचे. प्रत्येक वेळी अनामिक भिती दाखवून हिंदुत्व खतरे मे सांगितलं जातं, असेही ते ( Uddhav Thackeray Criticized BJP ) म्हणाले.

एमआयएम बरोबर जाणे कदापि शक्य नाही

आपल्याला हिंदुत्व विरोधी ठरवतात. मध्येच काही कारण नसतांना एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याची विधान केली. आम्ही एमआयएम बरोबर जाणे कदापि शक्य नाही. अफझल गुरूला फाशी देऊ नका म्हणाणारे मेहबूबा सारख्यांच्या मांडीला मांडी लावली. मग काय मोहन भागवतांना खान वगैरे म्हणणार आहात? पहिले सावरकरांवर आम्हाला शिकवतात, भागवतांनी म्हटले सावरकर मुस्लिम विरोधी नव्हते. उर्दूत त्यांनी गझल लिहिली. रा. स्व संघाच्या विचारसरणीत आणि आपल्यात समानता. परंतु आम्ही काही केले तर वाईट, तुम्ही केले ते आदर्श असे नाही. संघ मुक्त भारत नितिश बोलले. ते सत्तेसाठी यांना चालतात. हे भाजपचे राजकारण वाईट आहे. भागवत म्हणतात, संघ का विचार है, हिंदुत्व का विचार. उस पर चलते रहो. हिंदु धर्मशास्त्र ये मानवधर्मशास्त्र है, इसलिए हमारा हिंदु राष्ट्र है. विविधता मे एकता को दुनिया हिंदुत्व कहती है, इसमे मुस्लमान नहि चाहिए ऐसा आया तो वो हिंदुत्व है. यावर भाजपचे चमचे उत्तर देऊ शकतील का? हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असे सुध्दा उद्या हे म्हणतील. आपल्या तो बाबा इतरांचे गुंड? अशी भाजपची नीती असल्याचा जोरदार टोला ठाकरे यांनी लगावला.

तुमचा काय हिजबूल पक्ष म्हणायचे का?

राज्यपालांवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. वर्षभर होऊन गेले तरी काही नाही. हा सरकारचा अधिकार तो न करणे हा लोकशाहीचा खून आहे. भाजपाचा कारभार म्हणजे ७ वर्षात काहीच केले नाही. केवळ आम्हाला पाकधार्जिणे, देशद्रोही ठरवणे हाच एक कार्यक्रम आहे. कश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा व्ही पी सिंग यांचे सरकार होते. त्यांना तेव्हा भाजपचे समर्थन होते. पंतप्रधान व्ही पी सिंग यांना शिवसेनेने विरोध केला, कारण ते जामा मशिदीत गेले होते. तेव्हा भाजप एक शब्द बोलला नाही. तेव्हा फक्त बाळासाहेंनी सगळ्यांना अंगावर घेतले. अतिरेकी, अमरनाथ यात्रा इत्यादि अनेक मुद्यावर बोलले. हिंदुस्थान- पाकिस्तान बस सेवा वाजपेयींनी सुरु केली. इथपासून तर पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथंपर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुमच्या पक्षाला काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? आम्ही अस काही म्हणणार नाही. हिंदुत्व भाजपचे कसे थोतांड आहे, त्यांनी भीतीचा निर्माण केलेला हा भ्रम घराघरात जाऊन दूर करायचा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.

हिटलर आणि त्याचे प्रवक्ते

हिटलर आणि त्याचे प्रवक्ते असं वातावरण आहे. त्यांच्या चार फळ्या आहेत. पहिली फळी त्यांची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडणे, दुसरी विरोधकांना उत्तर देणे, तिसरे आरोप करणे, चौथी अफवा पसरवणे. गोबेल्स निती हीच भाजपची भीती आहे. इतरांना सत्ता दिली तर खोटे भीतीचे चित्र उभे करायचे. औरंगजेबांच्या कबरीवर डोके टेकवणारा सोबत युती शक्य नाही. शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो करुन दाखवतो. आता युवा सैनिक पण आहेत. शिवसेनेचा अंगार भंगारांना दाखवून द्या. नवहिंदूकडून जो बुरखा पांघरलेला आहे तो फाडण्याचे पवित्र काम हे शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार. महाराष्ट्र काय आहे हे दिल्ली पर्यंत कळेल पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.