ETV Bharat / city

महाडच्या तळई गावात 32 घरांवर दरड कोसळली, 400 ते 500 नागरिक अडकल्याची शक्यता

author img

By

Published : Jul 22, 2021, 6:41 AM IST

Updated : Jul 22, 2021, 10:41 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
BIG BREAKING UPDATE 22 JULY

twitter
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये चर्चा

22:39 July 22

महाडच्या तळई गावात 32 घरांवर दरड कोसळली, 400 ते 500 नागरिक अडकल्याची शक्यता

महाड - महाडमधील तळई गावात दरड कोसळली आहे. यात साधारण 400 ते 500 नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. एनडीआरएफ, कोस्ट गार्डचे जवान पुराच्या पाण्यात अडकल्याने बचावकार्यास वेळ लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. पावसाचा जोर अजून सुरू आहे.

22:23 July 22

खडकवासला धरणातून विसर्ग; डेक्कन नदीपात्र परिसरातील अनेक रस्ते बंद

पुणे - खडकवासला धरणातून 18491 क्‍युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये करण्यात येणार आहे. धरण क्षेत्रामध्ये अजून सुद्धा पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे. पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पाण्याचा वाढता विसर्ग पाहता हे रस्ते देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

22:18 July 22

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

पुणे - पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून १०,०९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

21:57 July 22

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन; पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, कोकणात पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये परिस्थिती बिकट आहे. कोकणातील पूरपरिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूरपरिस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.  

21:51 July 22

नागपूर जिल्ह्यात आज मुसळधार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

नागपूर - नागपूर शहराला आणि जिल्ह्याला आज पावसाने धुतले आहे. त्यामुळे नदी, नाले ओव्हरफलो झाले आहेत. कान्होलीबारा मार्गावर वाहतूक ४ तास बंद करण्यात आली होती. बुधवारपासूनच सुरू असलेला रिपरिप पाऊस आज धो धो बरसल्याने दोन तास हिंगणा तालुक्यातील नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. वेणा नदीच्याही पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूर आला आहे. पावसाने आज कान्होलीबारा मार्गावरील पिपळधरा व महालदेव येथील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने ३-४ तास वाहतूक खोळंबली होती.

21:45 July 22

कोयना धरणातून शुक्रवारी सकाळपासून विसर्ग होणार सुरू

सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात आवक होत असलेने उद्या (23 जुलै 2021) सकाळी 8 वाजता धरणातून नदीपात्रात एकूण 10000 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 25000 क्युसेक इतका करण्यात येणार आहे.

21:18 July 22

पूरपरिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये चर्चा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. यावेळी  राज्यातील पूरपरिस्थितीबाबत पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून माहिती घेतली आहे. तसेच केंद्र सरकार या परिस्थितीत राज्य सरकारला लागेल ती मदत करायला तयार असल्याचेही मोदी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.  राज्यात सद्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकण भागात अनेक ठिकाणी पूर आला आहे. 

20:05 July 22

भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात तापी नदीवर असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज सायंकाळी धरणाचे 20 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. सध्या तापी नदीपात्रात 34 हजार 785 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तापी आणि पूर्णा या नद्यांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 10 तासात 9.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

19:18 July 22

कोरोना योद्धांना 50 लाखांचा विमा सुरक्षा द्या, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद - कोरोना योद्धांना 50 लाखाच्या विम्याची सुरक्षा देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. यबाबत निर्णय घ्यावा अन्यथा 5 ऑगस्टला मुख्य सचिवांनी स्वतः न्यायालयात उपस्थित राहून म्हणणे मांडावे, असे खडपीठाने आदेश दिले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात नगरपालिका, नगर पंचायतींतील कोरोनामूळे मृत्यू  झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय 5 ऑगस्टपर्यंत घ्यावा, अन्यथा 5 ऑगस्टला राज्याच्या मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात उपस्थित राहून म्हणणे सादर करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांनी दिले आहेत.

18:50 July 22

वर्धा; नाल्याला आलेल्या पुरात दोघे वाहून गेले

वर्धा -  समुद्रपूर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले आहेत. समुद्रपूर नजीकच्या लाहोरी रोडवरील वाघाडी नाल्याला पूर आला आहे. रंभाबाई मेश्राम महिला शेतात निंदण करण्यासाठी गेली असता, या पुरात  ती वाहून गेली आहे. दुसरी घटना तास शिवारात घडली आहे. तास येथील शाळेलगतच्या नाल्याला पूर आला, त्यात संतोष शंभरकर हे बैलबंडीसह वाहून गेले आहेत. दोघांचाही शोध घेण्यात येत आहे. 

18:02 July 22

साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

शिर्डी - गुरूपोर्णिमा उत्सवाला साईनगरीत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.

17:17 July 22

कोकणातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई - गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली असून, यात पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच या भागात रेड आणि ऑरेंज अलर्टही जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

17:14 July 22

पालिकेची स्थायी समिती सभा तहकूब केल्याने भाजपचा सेनेवर वार, सेनेचेही प्रत्युत्तर

मुंबई - मुंबईत रविवारी पहाटे मुसळधार पावसात दरडी कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला होता. आज पालिकेची स्थायी समिती बैठक मृतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेने पळ काढला आहे. शिवसेनेला चर्चा करायची नसल्याने कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, कोणालाही बोलायला दिले नाही, असा आरोप भाजपने केला आहे. तर भाजपच्या संवेदना मृत झाल्या आहेत. भाजपचा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. भाजपने मृतांच्या प्रकरणी राजकारण करू नये, असे प्रत्युत्तर शिवसेनेने दिले आहे. 

16:26 July 22

खडकवासला धरणातून थोड्याच वेळात २४६६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार

पुणे - खडकवासला धरणामध्ये १.७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी ४:३० वाजता २४६६ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. 

16:16 July 22

दहगाव नाल्यात वाहून गेला तरुण, शोधमोहीम सुरू

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतील कुपटी येथील  विजय येलुतवाड हा तरुण दहगाव नाल्यात वाहून गेला. त्या अनुषंगाने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. तरुण हा नाला पार करत असताना वाहून गेला आहे.  

16:12 July 22

पालघरमध्ये मुसळधार; NDRF ची तुकडी जिल्ह्यात दाखल

पालघर -  पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एनडीआरएफची एक तुकडी पालघर जिल्ह्यात दाखल झाली आहे. 

16:06 July 22

ठाणे, कोर्टनाका येथे नाल्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचा 4 दिवसानंतर मृतदेह सापडला

ठाणे - शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामध्ये रात्री २ वाजताच्या सुमारास आंबेडकर रोड, कोर्टनाका याठिकाणी जीवन ओहाळ या व्यक्तीने नाल्यामध्ये उडी मारली होती. या व्यक्तीचा मृतदेह नाल्यात वाहून गेला होता. मागील ४ दिवसांपासून आतापर्यंत अग्निशामक विभाग आणि TDRF च्या मदतीने शोधकार्य सुरू होते. आज दुपारी १२ वाजता गणेश विसर्जन घाटाजवळ विटावा याठिकाणी खाडीमध्ये जीवन ओहाळ व्यक्तीचा मृतदेह TDRF पथकाला सापडला. हा मृतदेह कळवा पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे याठिकाणी पाठविण्यात आला आहे.

15:38 July 22

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; CBI करू शकते चौकशी

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआय अनिल देशमुख यांची चौकशी करु शकते. 

15:32 July 22

अमरावतीमधील पूर्णा धरण ओव्हरफ्लो; 9 दरवाजे उघडले

अमरावती - अमरावती जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा धरण आता पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणाचे 9 दरवाजे आता 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 61.62 घ.मी.से ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नऊही दरवाजे उघडल्याने आता धरण परिसरात विहंगम दृश्य तयार झाले आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

11:54 July 22

आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये  परमबीर सिंह  यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.  

10:45 July 22

मुंबईतील किंग्स सर्कलच्या येथे रेल्वे पुलाखाली कंन्टेनर अडकल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाले.

10:43 July 22

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भाचे पंढरपूर बंद

दरवर्षी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी होत असते. त्याच प्रमाणे विदर्भाचे पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे आषाढ पौर्णिमेला म्हणजे गुरू पौर्णिमेला यात्रा भरत असते. भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी होऊ नये म्हणून ही यात्रा रद्द केली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

10:43 July 22

रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत असून नागरिकांची दाणादाण उडाली आहे. सावित्री आणि काळ नद्यांचे पाणी महाडमध्ये घुसल्याने महाड शहर पाण्याखाली आले आहे. शहरातील पाणी पातळीत वाढ होत असल्याची जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती.

10:43 July 22

जळगावच्या तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे बारा दरवाजे आज पूर्ण उघडण्यात आले

10:43 July 22

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम चिपळूण येथील पुरजन्य परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी रवाना झाली आहे.

08:35 July 22

जंतर-मंतर येथे आम्ही 'शेतकरी संसद' घेणार आहोत. आम्ही संसदेच्या कामकाजावर नजर ठेवू, असे बीकेयू नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं.

08:35 July 22

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जंतर-मंतर येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टिकरी बॉर्डरवर भारी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

08:35 July 22

आज दुपारी अडीच वाजता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव संसदेत बोलणार आहेत.

06:38 July 22

राज्यात ४ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण पूर्ण

लसीकरणात राज्यानं 4 कोटीचा टप्पा पार केला आहे. सोमवारी राज्यभरात 1 हजार 482 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 1 लाख 89 हजार 733 नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत लसीच्या 4 कोटी 1 लाख 8 हजार 574 मात्रा लाभार्थ्यांना टोचवण्यात आल्या आहेत. ही माहिती आरोग्य विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातील आहे. 

06:38 July 22

लवकरच बालकांचे लसीकरण करण्यात येईल : केंद्रीय आरोग्यमंत्री

देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढत आहे. देशात तीसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी लस चाचणी घेण्यात आली. ही बालकांसाठीच्या लसीकरणाची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली. तसेच लवकरच बालकांचे लसीकरण करण्यात येईल, असे ते म्हणाले. 

06:13 July 22

Big Breaking Maharashtra

मुंबई - मुंबई महापालिकेने टि्वट करून आज लसीकरण होणार नसल्याचे सांगितले. लसींचा साठा पुर्ववत झाल्या नंतर पुन्हा लसीकरणाला वेग येईल.'मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (२२ जुलै २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही. रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण लसीकरण केंद्राना उद्या केले जाणार आहे. लसीकरणाविषयी पुढील सूचना आम्ही देत राहू', असे टि्वट मुंबई महापालिकेने केले आहे. अपुऱ्या लसींमुळे काल देखील ३०९ पैकी केवळ ५८ लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होतं.

Last Updated :Jul 22, 2021, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.