ETV Bharat / city

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास तत्वतः मंजुरी

author img

By

Published : Jan 15, 2021, 8:22 PM IST

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

नांदेड शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी अंदाजे साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मुंबई- नांदेड शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने तत्वतः मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी अंदाजे साडेसहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

नांदेडसह हिंगोली आणि परभणी देखील महामार्गाला जोडले जाणार

ते पुढे बोतलाना म्हणाले की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नांदेड शहर जोडले गेले पाहिजे, ही माझी मनःस्वी इच्छा होती. त्यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉइंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्हासुद्धा महामार्गाला जो़डला जाईल. या प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी १९४ किमी असून, त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च लागण्याचा अंदाज आहे. या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठीचा अहवाल तयार करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग जेएनपीटीशी जोडला जाणार असल्याने नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील माल आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी वेळेत पोहोचवता येणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्यास तत्वतः मंजुरी

नांदेडमध्ये देखील नव्या रस्त्यांची निर्मिती होणार

नांदेड-जालना या समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकचा भाग म्हणूनच नांदेड शहरातही रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नांदेड शहरातील हिंगोली गेट - बाफना चौक - देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) या रस्त्याची सुधारणा, उड्डाण पूल व देगलूर नाक्यानजीक गोदावरी नदीवरील पूल ही कामे देखील या प्रकल्पाचा भाग म्हणून केली जाणार आहेत. या कामांनाही यावेळी तत्वतः मंजुरी देण्यात आली असून, ही कामे सुमारे १ हजार कोटी रुपयांची आहेत. विशेष म्हणजे नांदेड शहरातील या नवीन रस्त्यांचा व पुलाचा वापर करण्यासाठी नांदेडकरांना कोणताही टोल द्यावा लागणार नाही. समृद्धी महामार्ग ते नांदेड शहरापर्यंतच्या रस्त्याचा खर्च अंदाजे ५ हजार ५०० कोटी रुपये आणि नांदेड शहरांतर्गत रस्ते व पुलासाठी लागणारा अंदाजे खर्च १ हजार कोटी रुपये असे एकूण साडेसहा हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प म्हणजे मकरसंक्रांतीच्या पर्वावर महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने नांदेड आणि मराठवाड्याला दिलेली मोठी भेट आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी यापुढेही मोठे काम करावे लागणार आहे. नागरिकांचे सहकार्य आणि आशीर्वादाच्या बळावर हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
· नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडल्यामुळे दळणवळण सुलभ होणार
· नांदेड ते मुंबई व औरंगाबाद प्रवासात वेळ व पैशांची बचत होणार
· मालवाहतुकीसाठी थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार
· स्थानिक व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.