माझे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी - अजित पवार

author img

By

Published : Oct 7, 2021, 12:16 PM IST

Updated : Oct 7, 2021, 1:10 PM IST

अजित पवार

सध्याचे राजकारण खालच्या थराला गेले आहे. शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. इन्कम टॅक्सच्या धाडी पडतात हे खरं आहे. माझ्यावरती धाड टाकली हे समजू शकतो पण माझे रक्ताचे नाते असलेल्यामुळे या धाडी टाकल्या जात आहेत. बऱ्याच लोकांच्या वरती धाडी टाकलेले आहेत असे ऐकायला मिळते, असे पवार म्हणाले.

मुंबई - माझ्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाड टाकली याचे मला काही नाही. मात्र, रक्त्याचे नाते म्हणून माझ्या बहिणींच्या घरी धाडी टाकल्या, याचे वाईट वाटते. यापूर्वी अनेक पक्षांची सरकार सत्तेत होती, परंतु, सत्तेचा इतक्या खालच्या थराला वापर कोणी केला नाही, असा संताप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला. सरकार येतात, जातात. आजपर्यंत सत्तेचा गैरवापर केलेला कोणी पाहिला नाही. जनता सर्वस्व आहे, ती योग्य तो निर्णय घेत असते, असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री पवार दिला.

अजित पवारांचे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी

आयकर विभागाच्या कारवाईवर संशय

पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, अहमदनगरमधील आंबालिका शुगर, सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाने छापे टाकले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी पडल्या. यावरच अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. होय माझ्याशी संबंधित कंपन्यांवर आयटीने धाडी टाकल्या आहेत. आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगले माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय, की आयकर विभागाला केवळ माहिती हवी होती, त्यांनाच माहित, असा संशय उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा

माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचे दुख आहे, ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली आहेत. त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचे कारण मला अद्याप माहिती नाही. ते व्यवस्थित आपले जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडे आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावे, असेही अजित पवार म्हणाले.

केंद्रातील मंत्र्यांच्या संस्थांवर धाडी का नाहीत

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जातो. राज्यात ही संस्था काम करतात. मात्र, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांच्याही अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी कोणावर धाडी पडल्या आहेत का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित केला.

Last Updated :Oct 7, 2021, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.