ETV Bharat / city

आबा तुम्हीच लढा!...तेव्हा कार्यकर्त्यांनी धरला होता आग्रह

author img

By

Published : Jul 31, 2021, 6:04 AM IST

गणपतराव देशमुखांनी, मी 2019 विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, यावेळीही आबा तुम्हीच लढा! असा कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला होता.

ganpatrao deshmukh
संग्रहित फोटो गणपतराव देशमुख

मुंबई/सोलापूर - सध्याच्या राजकारणात 'आशेचा किरण' वाटावी अशी बोटावर मोजण्याइतकीच माणसे आहेत. ज्यांच्याकडे पाहुण राजकारणातही चांगुलपणा असल्याचे समजते. राजकारणात राहूनही निर्मळ राहता येतं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख. शुक्रवारी (30 जुलै) गणपतराव देशमुख यांचे सोलापुरात निधन झाले. तब्बल ११ वेळा विधानसभेत निवडून येण्याचा विक्रम करणारे देशमुख देशातील एकमेव आमदार आहेत. पाहुया त्यांच्याच कारर्किर्दीचा एक आढावा....

हेही वाचा - 'विधानसभेचं विद्यापीठ' : जाणून घ्या, गणपतराव देशमुखांबद्दल...

  • आबा तुम्हीच लढा -

गणपतराव देशमुखांनी, मी 2019 विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, यावेळीही आबा तुम्हीच लढा! असा कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला होता. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव मी लढणार नसल्याचे गणपतराव देशमुख यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यावेळी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी शेकापच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात अनिकेत देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले होते. त्याच पार्श्वभूमीवर सर्वाधिक वेळा निवडून येणारे सांगोला तालुक्याचे शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख हे 2019 ची निवडणूक लढवणार का? हा चर्चेचा विषय त्यावेळी ठरला होता. देशमुखांनी आतापर्यंत विधानसभेच्या तब्बल १३ निवडणुका लढवल्या आहेत. त्यामध्ये ते ११ वेळा विजयी झाले आहेत.

हेही वाचा - साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

  • २०१४ ला देशमुखांनी करुणानिधींचा विक्रम मोडला -

विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक १० वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे (डीएमके) नेते एम. करुणानिधी यांनी विक्रम केला होता. मात्र, २०१४ ला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांचा विक्रम मोडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून देशमुख तब्बल ११ वेळा विक्रमी मतांनी विजय झाले. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधींच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.

  • १९७२ आणि १९९२ चा अपवाद वगळता सर्व निवडणुकीत विजयी -

गणपतराव देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

  • बहुतांश वेळा विरोधी बाकावरच -

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते. मात्र, १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा २ वेळा देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. इतके वर्ष विरोधी बाकावर बसूनही गणपतराव देशमुखांना सत्तेचा मोह कधीच झाला नाही.

  • पक्षांतराच्या काळातही देशमुख एकनिष्ठ -

2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले होते. अशा काळातही गणपराव देशमुख शेकापशी एकनिष्ठ राहिले होते. कितीतरी दिग्गज नेत्यांनी राजकीय हवेचा अंदाज बघून दुसऱ्या पक्षात उड्या टाकल्या. मात्र, अशा काळतही देशमुख शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ राहिले.

हेही वाचा - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सांगोल्यात आज होणार अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.