ETV Bharat / city

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद'मुळे बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले?

author img

By

Published : Jul 24, 2022, 5:42 PM IST

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून ( Aaditya Thackeray Shivsanvad Yatra ) महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या पायखालाची ( Shivsena Rebel Mla ) वाळू सरकली आहे.

मुंबई - राज्यातील राजकीय नाट्यांतरानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिंदे गटातील आमदार व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत बंडखोर आमदारांवर टीकास्त्र करायला सुरुवात केली आहे. तसेच, त्यांच्या दौऱ्याला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले आहेत.



आदित्य ठाकरे यांची सुरुवात जोमात? - राज्यात कधी नव्हे असं राजकीय नाट्यांतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी ने पाहायला भेटलं. पाच वर्ष ठामपणे चालणार असं भाकीत करणार महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच गडगडलं. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा असून, आपल्यासोबत ४० बंडखोर आमदारांना फोडण्यात त्यांना मोठे यश आलं. परंतु, हे फोडाफोडीचे राजकारण ठाकरे परिवाराला अद्याप पटलेल नसून हे दुःख पेलवण ठाकरे परिवाराला तितकं सोपं नाही. मात्र, जे शक्य होईल ते सर्व करून या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली असून, महाराष्ट्रातील ३ दिवस केलेल्या शिवसंवाद यात्रेतून त्यांनी या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.



आदित्य यांच्या यात्रेला, सभेला, भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद - आदित्य ठाकरे यांनी 'शिवसंवाद'यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर दौरे केले. या दौऱ्यामध्ये त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत ज्या ज्या ठिकाणी बंडखोर आमदारांनी बंड पुकारले आहे. त्या त्यांच्या मतदारसंघांमध्येच त्यांना उघडपणे चॅलेंज दिली आहे. औरंगाबादमध्ये बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला तुफान गर्दी बघायला भेटली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर शाब्दिक हमला सुद्धा मोठ्या प्रमाणात केला. आदित्य ठाकरे यांच्या सभेला रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी पाहायला भेटली. त्यांच्या या सभेने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारू लागलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यात सभेला व भाषणाला मिळणारा प्रतिसाद याने शिंदे गटातील बंडखोर आमदारांची चिंता नक्कीच वाढणारी आहे.


बंडखोर आमदारांची चिंता वाढली? - आदित्य ठाकरे यांनी नाशिक मधील सभेत बंडखोर रामदास सुहास कांदे यांच्यावर सटकून टीका केली होती. मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकी नसते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर केला होता. तुम्ही गद्दार नसता तर मी तुमच्या प्रश्नांना उत्तर दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली? याचे उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना खडसावले आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी बंडखोर आमदारांना चिंतेत टाकले आहे.



मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र निशाण्यावर - मराठवाड्यात प्रदीप जयस्वाल, धनराज चौगुले, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाट, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, रमेश बोरणारे या आठ बंडखोर आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु औरंगाबादमधील सभेमध्ये जो उत्साह आदित्य ठाकरे यांच्या 'शिवसंवाद' यात्रेदरम्यान बघायला भेटला त्याने नक्कीच मराठवाड्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये बंडखोर आमदारांना याचा फटका बसेल हे दर्शवते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात शंभूराजे देसाई, प्रकाश आंबिटकर, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी बापू पाटील या पाच आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात समावेश केला आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात दादा भुसे, सुहास कांदे, गुलाबराव पाटील, लताबाई सोनवणे, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांनी बंडखोरी करत शिवसेना गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे सध्या २४ दिवस उलटूनही एकनाथ शिंदे - फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. दुसरीकडे हे पूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अजूनही याबाबत स्पष्टता नाही आहे. म्हणून सध्या या बंडखोर आमदारांचं टेन्शन वाढलं असून, त्यातच ज्या पद्धतीने शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होऊन या बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहे. त्या अनुषंगाने आता बंडखोर आमदारांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.



'संजय राऊत जबाबदार कसे?' - एकनाथ शिंदे च्या गटाच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर विशेष करून त्यांनी शिवसेनेमध्ये आमची घुसमट होत होती. आम्हाला विचारात घेतले जात नव्हते, आम्हाला मातोश्री, वर्षावर येऊ दिले जात नव्हते व यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सुद्धा जबाबदार आहे. त्यांचा वारंवार उल्लेख करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये बंडखोर आमदारांनी बंड पुकारले याला ठाकरे कुटुंब जबाबदार असून, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्याच कारणच नाही, असं सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून २४ दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा न झालेला विस्तार. सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असलेलं न्यायप्रकरण आणि त्यातच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आमदारांची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच टेन्शन आता जास्तच वाढलेलं आहे.




हेही वाचा - Raju Vitakar : शिंदे गटात गेलेला शिवसैनिक पुन्हा ठाकरे गटात सामील; 'त्या' रात्री नेमक काय घडलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.