अंधार-निर्जनस्थळी गस्त वाढवा; मुंबापुरीतील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

author img

By

Published : Sep 14, 2021, 9:04 AM IST

Commissioner of Polic

साकीनाका बलात्कार प्रकरणाने मायानगरी मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे १२ कलमी आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत. महिलांच्या संदर्भातील कॉलकडे नियंत्रण कक्षाने दुर्लक्ष करु नये इथपासून रात्रीच्यावेळी एकट्या महिलेची विचारपूस करुन त्यांना निश्चितस्थळी सुरक्षित पोहोचवण्यास मदत करण्याच्या उपाययोजनांचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. अंधार, निर्जनस्थळी गस्त वाढवून तिथे होणारे अनुचित प्रकार तातडीने थांबवण्याचेही आदेश पोलीस आयुक्तांनी संबंधीत पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

मुंबई - साकीनाका येथे रात्रीच्या वेळी एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आला. या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून महिलांच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काही उपाययोजना सुचवल्या असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

या आहेत उपाययोजना -

1. साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद 10 मिनिटे इतका होता. अशावेळी पोलिस नियंत्रण कक्षाची जबाबदारी महत्वाची असते. कोणाताही कॉल विशेष करून महिलांच्या संदर्भातील कॉलकडे दुर्लक्ष करू नये. तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी. नियंत्रण कक्षाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे.

2. पोलीस ठाणे हदीतील अंधाराची आश्रयस्थान, निर्जन ठिकाणे, यांचा आढावा घेवून त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहने यांची गस्त वाढवावी.

3. अंधार आणि निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था, करण्याकरिता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा, अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याकरिता संबंधितांकडे प्रस्ताव सादर करुन याबाबात पाठपुरावा करावा.

4. निर्जन ठिकाण, अंधाराच्या जागा या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत. जेणे करून गस्तीवरील वाहने, गस्त करणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचा वावर होऊन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल.

instruction to increase patrolling in dark and secluded places
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे १२ कलमी आदेश

5. पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला शौचालय आहेत त्या ठिकाणी महापालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी.

6. गस्ती दरम्यान पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी संशयीत व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करून त्यांच्याकडे त्या ठिकाणी येण्याच्या प्रयोजनाबाबत चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

७. रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलीस अधिकारी / अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तत्काळ योग्य ती मदत देण्यात यावी. गरज भासल्यास महिलेस सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था करावी.

८. पोलीस ठाणे हद्दीतील अमली पदार्थांची नशा करणारे व अमली पदार्थ बाळगणाऱ्या लोकांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.

९. पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासुन उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, ट्रक व गाडयांच्या मालकांचा शोध घेवून वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगणे. अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवून कारवाई करावी .

१०. महिलांसंबंधीत गुन्हयात भारतीय दंड विधान कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा ( Sexual offender list ) व अशा सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.

११. ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाडया थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलीस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री १० वाजता ते सकाळी ७ वाजे पर्यंत तैनात करण्यात यावे. मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकटया येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी, तसेच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा क्रमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल क्रमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी एकटया महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी.

instruction to increase patrolling in dark and secluded places
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे १२ कलमी आदेश

१२. ज्या पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलीस ठाणेतील रात्रीच्या गस्तीवरील अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर भेटी दयाव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

या सुचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.