ETV Bharat / city

दीपावली विशेष : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 'किरणोत्सव'

author img

By

Published : Nov 13, 2020, 12:25 PM IST

ambabai temple in kolhapur
दीपावली विशेष : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 'किरणोत्सव'

मागील 4 दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सव सोहळा सुरू आहे. या मंदिराच्या वास्तूकलेचे हे एक वैशिष्ट्य आहे.

कोल्हापूर - मागील 4 दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सव सोहळा सुरू आहे. काल किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचली. 5 वाजून 41 मिनिटांनी सूर्यकिरणं कासव चौकात आली. त्यानंतर किरणांनी गर्भ कुटीत प्रवेश केला. 5 वाजून 47 मिनिटांनी किरणांनी देवीचा चरण स्पर्श करत पुढे ती देवीच्या चेहऱ्यावर स्थिरावली आणि लुप्त झाली. दरवर्षी साधारणपणे चौथ्या आणि पाचव्या दिवशी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पूर्ण क्षमतेने पार पडतो. वास्तुशास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. यावेळी मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने हा किरणोत्सव सोहळा भक्तांना प्रत्यक्षात पाहता आला नाही.

दीपावली विशेष : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 'किरणोत्सव'
किरणोत्सव सोहळ्याची खास वैशिष्ट्ये
किरणोत्सव सोहळा वर्षातून दोन वेळा पार पाडतो. जानेवारी महिन्यात होणाऱ्या सोहळ्याला उत्तरायण किरणोत्सव सोहळा तर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सोहळ्याला दक्षिणायन किरणोत्सव सोहळा म्हणतात. सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणं पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी कंबरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. गेल्या 4-5 वर्षांपासून मंदिरातील किरणोत्सव 5 दिवसांचा केला असून पाचही दिवस सूर्याची मावळती किरणे मंदिरातील गर्भगृहात पोहोचतात.
ambabai temple in kolhapur
मागील 4 दिवसांपासून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील दक्षिणायनातील किरणोत्सव सोहळा सुरू आहे.
दीडशे मीटर मंदिरात पोहोचतात किरणं
साधारण दीडशे मीटरहून अधिक अंतर कापून महाद्वार कमानीतून येणारी ही किरणं गरुड मंडप, गणेश मंडप, मध्य मंडप, अंतराल मंडप, गर्भागार आणि त्यानंतर देवीच्या मूर्तीवर पडतात. मूर्तीपर्यंत पोहोचलेली सूर्याची मावळती किरणे पाहण्यासाठी मंदिरातील सर्वच विद्युत दिवे बंद केले जातात. मूर्तीला किरणांचा स्पर्श झाल्यानंतर किरणे लुप्त होतात. त्यानंतर मोठा घंटानाद करून देवीची आरती केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या सुंदर, अलौकिक आणि अद्भुत उत्सवापासून यंदा भाविकांना मुकावे लागले आहे.


यावर्षी किरणोत्सव सोहळा ऑनलाइन

दरवर्षी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी देशभरातील भाविक येत असतात. मात्र यावर्षी भक्तांना मंदिर बंद असल्याने प्रत्यक्षात या सोहळ्याचा आनंद घेता येत नाही. भाविकांना घरबसल्या हा सोहळा पाहता यावा, यासाठी लाइव्ह प्रक्षेपणाची सोय करण्यात आली असून सर्व सोशल मीडियावर हे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.