ETV Bharat / city

नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकले, आढावा बैठक घेणार असल्याची सामंत यांची माहिती

author img

By

Published : Sep 29, 2021, 1:36 PM IST

अभियांत्रिकी आणि औषधीशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची एमएचटी-सीईटी परीक्षा (28 सप्टेंबर)रोजी होती. मात्र, मराठवाड्यात रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत होते. रस्त्यावरून-पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊ शकले नाहीत. यामुळे विद्यार्थी ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थी परीक्षांना मुकले
नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थी परीक्षांना मुकले

औरंगाबाद - मंगळवारी दिवसभर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागल्याचीही गोष्ट समोर आली आहे. (28 सप्टेंबर)रोजी एमएचटी-सीईटी परीक्षेला या पुरामुले अनेक विद्यार्थ्यांना जाता आले नाही. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थी परीक्षांना मुकले
एव्हरेस्ट कॉलेज केंद्रांवर विद्यार्थी परीक्षेला मुकले

28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे जटवाडाजवळ असलेला हर्सूल तलाव ओसंडून वाहत होता. पाण्याचा जोर इतका होता की, जटवाड्याकडून हर्सूल तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे त्या मार्गावर कोणालाही जाता येत नव्हते. अशा वेळेस त्या रस्त्यावर असलेल्या एव्हरेस्ट कॉलेज परीक्षा केंद्रावर होणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना जाता आले नाही. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात या ठिकाणी परीक्षा होती. सकाळच्या सत्रात 300 पैकी 254 विद्यार्थी परीक्षेला हजर राहू शकले. तर, 46 विद्यार्थी परीक्षेला पोहोचू शकले नाहीत. तर दुपारी दोन वाजता होणाऱ्या सत्रामध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दीड वाजता पोहोचणे गरजेचे होते. परंतु, पावसाचा जोर आणि हर्सूल तलावात ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता बंद असल्याने, या केंद्रावर तीनशे विद्यार्थ्यांपैकी 131 विद्यार्थी पोहोचू शकले. 169 विद्यार्थी परीक्षेला जाऊ शकले नाहीत. त्याबाबत या मुलांची आणि परिस्थितीची माहिती सिटी सेलला पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मराठवाड्यात अनेक विद्यार्थी मुकले परीक्षेला

अभियांत्रिकी आणि औषधीशास्त्र विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी एमएचटी-सीईटी परीक्षा पूर्वनियोजित होती. मात्र, मराठवाड्यात रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाल्याच पाहायला मिळाले. रस्त्यावरून - पुलावरून पाणी पाहत असल्याने नागरिकांना प्रवास करणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाऊ शकले नाहीत, विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

याबाबत लवकरच उच्च तंत्र शिक्षण विभाग घेणार बैठक

राज्यातून विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान पाहता याबाबत आढावा बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तर, मराठवाड्यात पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा देता न आल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या मंत्र्यांना याबाबत चर्चा करून तोडगा काढू, असे मत माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.