ETV Bharat / city

विशेष मुलाखत : डॉ. नेहा किर्दकने डॉक्टरकी सोडून पहिल्याच प्रयत्नात युपीएससी मिळवले यश

author img

By

Published : Aug 5, 2020, 4:10 PM IST

neha kirdak
औरंगाबादच्या डॉ नेहा किर्दकने पहिल्याच प्रयत्नात पास केली युपीएससी

नेहाच्या आईची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावं आणि वडिलांना वाटत होतं की मुलीने सनदी अधिकारी व्हावं. आज आई आणि वडील दोघांचं स्वप्न साकार करण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद होत असल्याची भावना नेहाने व्यक्त केली.

औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत औरंगाबादच्या नेहा किर्दक या युवतीने पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केले आहे. मिळालेले यश मी केलेल्या मेहनतीचे आणि आई वडिलांच्या विश्वासाचे फलित असल्याची प्रतिक्रिया नेहाने 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

नेहा किर्दक सोबत विशेष बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...

नेहाच्या आईची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावं आणि वडिलांना वाटत होतं की मुलीने सनदी अधिकारी व्हावं. आज आई आणि वडील दोघांचं स्वप्न साकार करण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद होत असल्याची भावना नेहाने व्यक्त केली. नेहाने पहिल्याच संधीचं सोनं करत 383 वा रँक पटकावला. डॉक्टर झाल्यावर फक्त एखाद्याचा जीव वाचवता आला असता, मात्र आता अधिकारी झाल्यावर सरकारी योजनांचा फायदा सर्वसामान्यांना मिळवून देत त्यांना नवं जीवन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नेहा किर्दकने व्यक्त केलं.

एमबीबीएसचं शिक्षण सुरू असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी नेहाने सुरू केली होती. रोज सतरा ते अठरा तास अभ्यासाचं नियोजन तिने केलं. पहाटे चार पासून ते रात्री 9 पर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास असा नेहाचा दिनक्रम होता. या अडीच वर्षांमध्ये सोशल मीडिया, मित्र परिवार सर्वांचा त्याग तिने केला. डॉक्टरची पदवी घेतल्यावर आपण जास्तीतजास्त रुग्णांची सेवा करू शकलो असतो, मात्र शासकीय सेवेत असल्यावर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. त्यामुळे तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादित केलं. या यशामुळे खूप आनंद मिळाला असल्याची भावना नेहाने व्यक्त केली. आज कोरोनाची परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी कसे काम करू शकतो हे सर्वांनी पाहिलं. त्यामुळे आगामी काळात महिला सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे नेहाने सांगितले.

कोरोनामुळे दिल्लीला परीक्षेला जाण्यास आल्या अडचणी...

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीसाठी दिल्लीला जायचे होते. जुलै महिन्यात दिल्लीला जायचं असताना औरंगाबादेत प्रशासनाने लॉकडाऊन लावला होता. त्यामुळे याकाळात विमानतळावर सोडण्यासाठी कुठलंही वाहन उपलब्ध झालं नाही. घरी दुचाकी होती त्यावर जाणं शक्य नव्हते. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी मदत केली. पोलिसांनी त्यांच्या गाडीत नेहाला विमानतळावर पोहचवलं. दिल्लीला जाताना दोनवेळचे जेवण तयार करण्याचे सामान नेऊन तिथे स्वतःच्या हाताने जेवण तयार केलं. मास्क, पीपीई किट, फेस शिल्ड घालून आपण मुलाखत दिली. अशा अडचणींचा सामना करत यश मिळालं असल्याचा अनुभव नेहा किर्दकने 'ईटीव्ही भारत'ला सांगितला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.