ETV Bharat / business

शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी ग्रीन झोनमध्ये; सेन्सेक्स 69 हजाराच्या पार, तर निफ्टी 20 हजार 800 वर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 2:55 PM IST

Share Market Update
संग्रहित छायाचित्र

Share Market Update : विधानसभा निवडणूक 2023 मध्ये भाजपानं यश मिळवलं आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात आज निकालाच्या दुसऱ्या दिवशीही दिसून आला. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी असल्याचं दिसून आलं.

मुंबई Share Market Update : चार राज्यात भाजपानं विजय संपादन केल्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपानं विजय मिळवल्यानं शेअर बाजार तब्बल 69 हजाराच्या पार गेला आहे. तर निफ्टीही 20 हजार 800 वर पोहोचल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडं जगभरातील शेअर बाजारात मंदी असताना भारतात मात्र शेअर बाजारात चांगलीच झळाळी आल्याचं स्पष्ट झालं.

सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात झळाळी : देशात पाच राज्याच्या निवडणुकांचा धुराळा उडाला असून त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला आहे. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी उसळी घेतल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. शेअर बाजारात आज बीएसईवर सेन्सेक्स 303 अंकानं वधारला. त्यामुळे शेअर मार्केट 69 हजार 081 वर गेला. तर निफ्टी 0.26 टक्क्यानं वधारला असून 20 हजार 741 वर पोहोचला. सोमवारी शेअर बाजारानं विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मंगळवारीही शेअर बाजारानं तेजीची नोंद केली. आज सकाळी निफ्टी 22 अंकांनी वाढून 20 हजार 821 अंकावर पोहोचला. जागतिक पातळीवर बाजार घसरला असून गुंतवणूकदारांनी आर्थिक डेटाचं मूल्यांकन केलं. त्यामुळे जागतिक पातळीवर शेअर बाजारात उताराची लाट असल्याचं स्पष्ट झालं.

जागतिक बाजारात निच्चांकी पातळीवर पोहोचला शेअर बाजार : जागतिक पातळीवर मात्र शेअर बाजार निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. हाँगकाँगमधील हँग सेंग निर्देशांक 1.1 टक्क्यांनी घसरला आहे. तर चीनमधील सीएसआय CSI 300 निर्देशांक 0.56 टक्क्यांनी घसरून चार वर्षांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मात्र दुसरीकडं भारतीय शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली. भाजपाच्या तीन राज्यात मिळालेल्या यशाचा हा परिणाम असल्याची चर्चा सध्या बाजारात सुरू आहे.

शेअर बाजारात सोमवारी मोठी घडामोड : सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्स 1 हजार 331 अंकांच्या उसळीसह 68 हजार 852 वर बंद झाला होता. दुसरीकडं निफ्टी 2.06 टक्के अंक वाढीसह 20 हजार 684 वर बंद झाला. शेअर बाजारातील कंपन्यांचं भांडवल 5.67 लाख कोटी रुपयांनी वाढून 343.35 लाख कोटी रुपये झालं. त्यात आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, बीपीसीएल आदी कंपन्या बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत होत्या. मात्र एचडीएफसी लाइफ, ब्रिटानिया, एचसीएल टेक, टीसीएसच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. त्यानंतर आज शेअर बाजारानं पुन्हा उसळी घेत नवा उच्चांक गाठला आहे.

हेवी वाचा :

  1. Muhurat Trading : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 'मुहूर्त ट्रेडिंग', तासभर उघडला शेअर बाजार
  2. शेअर बाजारावर भाजपाच्या विजयाचा इफेक्ट; सेन्सेक्स प्रथमच 68,000 पार, गुंतवणूकदारांनी 15 मिनिटांत कमावले 4 लाख कोटी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.