ETV Bharat / briefs

'स्वारातीम' विद्यापीठातील प्रा.डॉ.भगवान जाधव यांचा विष्णुपुरी जलाशयात बुडून मृत्यू..!

author img

By

Published : Oct 5, 2020, 8:36 PM IST

52 वर्षीय प्रा.भगवान जाधव हे सोमवारी सकाळी काळेश्वर मंदिराशेजारी पोहण्यासाठी एकटेच गेले होते. ते पाण्यात उतरले पण नंतर बाहेर आलेच नाहीत. रोजच्या वेळेनुसार ते सकाळी 10 वाजेपर्यंत घरी परतले नाहीत त्यामुळे काही जण त्यांचा शोध घेण्यासाठी विष्णुपुरीकडे गेले. तेव्हा जाधव यांचे वाहन व कपडेही घाटाजवळ दिसून आले. गोदावरी जीवरक्षक दलाला त्यांचा मृतदेह आढळला.

Prof. Dr. Bhagwan Jadhav drowned in Vishnupuri reservoir
Prof. Dr. Bhagwan Jadhav drowned in Vishnupuri reservoir

नांदेड - स्वारातीम विद्यापीठातील प्राध्यापक तथा अधिष्ठाता भगवान जाधव हे विष्णुपूरी जलाशय गोदावरीत पोहण्यासाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते विद्यापीठात अधिष्ठाता पदावर कार्यरत होते. या घटनेची नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नांदेड येथील ‘विष्णुपुरी’ जलाशय भरलेलले आहे. 52 वर्षीय प्रा.भगवान जाधव हे सोमवारी सकाळी काळेश्वर मंदिराशेजारी पोहण्यासाठी एकटेच गेले होते. आज ते पाण्यात उतरले पण नंतर बाहेर आलेच नाहीत. रोजच्या वेळेनुसार ते सकाळी 10 वाजेपर्यंत घरी परतले नाहीत. यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. नंतर काही जण त्यांचा शोध घेण्यासाठी विष्णुपुरीकडे गेले. तेव्हा जाधव यांचे खाजगी वाहन व कपडेही घाटाजवळ दिसून आले. मनपा व इतर यंत्रणांकडून पाण्यामध्ये चहुबाजूंनी जाधव यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, गोदावरी जीवरक्षक दलाने मृतदेह पाण्याबाहेर काढला.

तीन वर्षांपूर्वी परभणी-नांदेड दरम्यानच्या प्रवासातील एका भीषण अपघातात जाधव गंभीर जखमी झाले होते, पण दीर्घ उपचारानंतर त्यातून बरे झाले आणि कामात सक्रिय झाले. सलग तीन दिवसाच्या सुट्यानंतर सोमवारी सकाळी ते पोहायला गेले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.

प्रा.डॉ.भगवान जाधव यांचा परिचय -

परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील रहिवासी असलेले प्राध्यापक जाधव यांचे वास्तव्य विद्यापीठ परिसरातील निवासस्थानात होते. इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक म्हणून ते ओळखले जातात. परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केल्यानंतर 2012 मध्ये ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापकपदी रुजू झाले. विद्यापीठाच्या कला शाखेच्या घडामोडींमध्ये ते सक्रिय राहिले. अधिष्ठातासह विविध जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या आहेत. नव्या विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार गतवर्षी त्यांची पूर्णवेळ मानव्यविज्ञान शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्‍ती झाली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने विद्यापीठ वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.