ETV Bharat / bharat

चंद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग, जगभरात वाजला भारतीय शास्त्रज्ञांचा डंका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:38 AM IST

Chandrayaan 3
Chandrayaan 3

Chandrayaan 3 : २०२३ हे वर्ष भारताच्या अवकाश क्षेत्रासाठी संस्मरणीय ठरलं. यावर्षी चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करुन भारतानं जगभरात आपली क्षमता सिद्ध केली. भारतापूर्वी हा विक्रम फक्त अमेरिका, रशिया आणि चीन यांनीच केला होता. तथापि, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा एकमेव देश आहे.

हैदराबाद Chandrayaan 3 : २३ ऑगस्ट २०२३ चा दिवस भारतासाठी ऐतिहासिक होता. या दिवशी इस्रोचं चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरलं. यासह अंतराळ इतिहासात भारताचं नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवल्या गेलं आहे.

चंद्रावर उतरणारा केवळ चौथा देश : या मोहिमेच्या यशानंतर भारत चंद्रावर उतरणारा केवळ चौथा देश बनला आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया (पूर्वीचं सोव्हिएत युनियन) आणि चीन हे पराक्रम करू शकले होते. विशेष म्हणजे, यापैकी कोणालाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरता आलं नव्हतं. चंद्रयान ३ यावर्षी १४ जुलैला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आलं. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर घेऊन जाणारं हे यान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचलं. सॉफ्ट लँडिंगनंतर, रोव्हरनं १४ दिवस चंद्राच्या मातीचं परीक्षण केलं आणि संशोधन डेटा इस्रोला पाठवला.

एवढा खर्च आला : भारताच्या काही दिवसांपूर्वीच रशियानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी झाला. रशियानं या मोहिमेवर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च केले होते. तर भारतानं केवळ ६०० कोटी रुपये खर्च करुन मिशन पूर्ण केलं. भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेसंदर्भात टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांची एक पोस्ट व्हायरल झाली होती. मस्क यांनी भारताच्या चंद्र मोहिमेच्या बजेटची तुलना हॉलिवूडपट इंटरस्टेलरशी केली होती. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा' ने 'इस्रो'च्या या ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केलं होतं. एजन्सीनं लॉन्चच्या एका दिवसानंतर एक खास चित्र शेअर केलं. नासानं चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान ३ लँडर दर्शविणारं एक ट्विट पोस्ट केलं आहे.

लॅंडिगच्या लाइव्ह स्ट्रीमनं इतिहास रचला : चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग शिवाय इस्रोनं त्या दिवशी आणखी एक विक्रम रचला. इस्रोच्या चंद्रयान ३ मिशनची लाइव्ह स्ट्रीम जगभरात यू्ट्यूबवर सर्वाधिक पाहिली जाणारी लाइव्ह स्ट्रीम बनली आहे. यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी 'X' वर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. इस्रोच्या वेबसाईटचा लाइव्ह फीडचा स्क्रीनशॉट पाहून अंदाज लावला जाऊ शकतो, की त्या दिवशी भारताच्या चंद्रयान ३ मोहिमेबाबत किती क्रेझ होती. एकट्या यूट्यूबवर लॅंडिंगचं लाइव्ह स्ट्रीमिंग पाहणारे सुमारे ८ दशलक्ष दर्शक होते, जो एक विक्रम आहे.

चंद्रयान ३ चा प्रवास :

  • १४ जुलै: आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून LVM-3M-4 या वाहनाद्वारे चंद्रयान ३ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.
  • १५ जुलै: ITRAC/ISRO बेंगळुरू येथून पहिली कक्षा वाढवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
  • १७ जुलै: चांद्रयान ३ ची दुसऱ्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानं ४१६०३ किमी x २२६ किमी कक्षेत प्रवेश केला.
  • २२ जुलै: अन्य कक्षेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली.
  • २५ जुलै: चंद्रयान ३ ७१३५१ किमी x २३३ किमीच्या कक्षेत पोहोचलं.
  • १ ऑगस्ट: इस्रोनं 'ट्रान्सलूनर इंजेक्शन' यशस्वीरित्या पूर्ण केलं. अंतराळयान ट्रान्सलुनर कक्षेत ठेवलं. यानं २८८ किमी x ३६९३२८ किमीच्या कक्षेत पोहोचलं.
  • ५ ऑगस्ट: चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली. यानानं १६४ किमी x १८०७४ किमीची कक्षा गाठली.
  • ६ ऑगस्ट: यान १७० किमी x ४३१३ किमीच्या कक्षेत पोहोचलं. इस्रोने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्रयान ३ मधून घेतलेला चंद्राचा व्हिडिओ जारी केला.
  • ९ ऑगस्ट: चंद्रयान ३ ची कक्षा १७४ किमी x १४३७ किमी इतकी कमी झाली.
  • १४ ऑगस्ट: चंद्रयान ३ यानानं १५१ किमी x १७९ किमीची कक्षा गाठली.
  • १६ ऑगस्ट: यानानं चंद्राच्या जवळ जाण्यासाठी 'फायरिंग'ची प्रक्रिया पूर्ण केली. यान १५३ किमी x १६३ किमीच्या कक्षेत पोहोचलं.
  • १७ ऑगस्ट: लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं.
  • १९ ऑगस्ट: इस्रोनं लँडर मॉड्यूलची डी-बूस्टिंग प्रक्रिया सुरू केली.
  • २० ऑगस्ट: लँडर मॉड्यूलवर आणखी एक डी-बूस्टिंग करण्यात आली. मॉड्यूल २५ किमी x १३४ किमीच्या कक्षेत पोहोचलं.
  • २१ ऑगस्ट: चंद्रयान २ चा चंद्रयान ३ शी संपर्क झाला.
  • २२ ऑगस्ट: इस्रोनं चंद्रयान ३ च्या लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) द्वारे सुमारे ७० किलोमीटर उंचीवरून घेतलेली चंद्राची छायाचित्रं जारी केली.
  • २३ ऑगस्ट: इस्रोनं यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला.

हे वाचलंत का :

  1. भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी, एक नजर या अप्रतिम प्रवासावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.