ETV Bharat / bharat

उच्चशिक्षित हिंदुत्ववादी गडगंज संपत्तीचे मालक, कोण आहेत मध्य प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री मोहन यादव

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 6:16 PM IST

Mohan Yadav CM of MP : राज्यातील सर्व दिग्गजांना पराभूत करत उज्जैनचे आमदार डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. संघाचा पाठिंबा आणि हिंदुत्वाची विचारसरणी या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली.

Mohan Yadav
Mohan Yadav

भोपाळ Mohan Yadav CM of MP : छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशलाही नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. उज्जैन दक्षिणचे भाजपा आमदार मोहन यादव राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील.

मोहन यादव उच्चशिक्षित आहेत : बीएस्सी, एलएलबी आणि पीएचडी पदवीप्राप्त मोहन यादव पूर्वीच्या शिवराज सिंह सरकारमध्ये उच्च शिक्षणमंत्री राहिले आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत, ५८ वर्षीय मोहन यादव यांना ९५,६९९ मतं मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२,९४१ मतांनी पराभव केला. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर २०१८ मध्ये त्यांनी उज्जैन दक्षिण मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. मार्च २०२० मध्ये शिवराज सरकारच्या पुनर्स्थापनेनंतर जुलैमध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

विद्यार्थी नेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात : मोहन यादव यांचा जन्म २५ मार्च १९६५ रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी नेता म्हणून केली. १९८२ मध्ये ते माधव सायन्स कॉलेजचे सहसचिव बनले. यानंतर १९८४ मध्ये ते अध्यक्ष झाले. १९८४ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) उज्जैनचे शहर मंत्री पदावर पोहोचले. यानंतर १९८८ मध्ये त्यांना ABVP चे राज्य सहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आलं. १९८९-९० पर्यंत ते परिषदेच्या राज्य युनिटचे राज्यमंत्री झाले. यशाच्या पायऱ्या चढत त्यांनी १९९१-१९९२ मध्ये परिषदेचं राष्ट्रीय मंत्रीपद गाठलं. २०१३ मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी दुसरी निवडणूक लढवली आणि मंत्रीही झाले. २०२३ मध्ये त्यांनी तिसरी निवडणूक लढवली आणि थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले.

संघाची पसंती मानले जातात : मोहन यादव यांना तीन गोष्टी मुख्यमंत्रीपदापर्यंत घेऊन गेल्या आहेत. प्रथम म्हणजे संघाशी जवळीक. दुसरी हिंदुत्वाचा चेहरा आणि तिसरी माळव्यातील ओबीसी वर्गाचा मोठा नेता. ५८ वर्षीय मोहन यादव हे भाजपाच्या उच्चशिक्षित नेत्यांपैकी एक आहेत. ओबीसी प्रवर्गातील नेते असण्यासोबतच ते संघाची पहिली पसंतीही मानले जातात. मध्यप्रदेशात उच्च शिक्षणमंत्री असताना त्यांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरितमानसचे काही भाग समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये गणना : मोहन यादव यांची गणना राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये होते. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात हा खुलासा केला होता. मोहन यादव यांच्याकडे एकूण ४२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये सुमारे १० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून ३२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. २०१८ मध्ये सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या मध्य प्रदेशाच्या मंत्र्यांच्या यादीत मोहन यादव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

हे वाचलंत का :

  1. मध्य प्रदेशात भाजपाचा दे धक्का! शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं, वाचा नवीन मुख्यमंत्री कोण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.