भोपाळ MP CM : मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स अखेर सोमवारी संपुष्टात आला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर एकमत झालं आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. ते संघाच्या जवळचे मानले जातात. राज्यात जगदीश देवडा आणि राजेंद्र शुक्ला हे दोन उपमुख्यमंत्री असतील. याशिवाय नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी प्रस्ताव ठेवला : मिळालेल्या माहितीनुसार, शिवराज सिंह चौहान यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या घोषणेनं सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. आता राज्याची धुरा मोहन यादव यांच्या हातात असेल. या महत्त्वाच्या निर्णयापूर्वी भाजपा हायकमांडनं निरीक्षकांचं पथक भोपाळला पाठवलं होतं. यामध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, आशा लाक्रा आणि के लक्ष्मण यांचा समावेश होता.
मोहन यादव यांचं नाव चर्चेतही नव्हतं : छत्तीसगड प्रमाणेच मध्य प्रदेशातही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं धक्कातंत्राचा वापर केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शिवराज सिंह चौहान यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि व्हीडी शर्मा यांची नावं होती. मोहन यादव यांचं नाव चर्चेतही नव्हतं. इतकंच नव्हे तर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी झालेल्या फोटो सेशनमध्येही मोहन यादव मागच्या रांगेत बसले होते. मात्र आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देऊन भाजपानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
भाजपाला प्रचंड बहुमत : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी लढत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र निकाल लागताच काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला. राज्यात भाजपानं १६३ जागा जिंकल्या, तर कमलनाथ यांच्या नेतृत्वात लढणारी काँग्रेस केवळ ६६ जागांवर विजय मिळवू शकली.
हेही वाचा :