ETV Bharat / bharat

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना, काँग्रेसची बैठक, शिंदेंनीही गटाचे नाव ठरवले

author img

By

Published : Jun 25, 2022, 4:37 PM IST

Updated : Jun 25, 2022, 5:02 PM IST

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग

राज्यातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर विविध राजकीय पर्याय तपासले जात आहेत. त्याअनुषंगाने सर्वच पक्षांचे प्रयत्न आणि बैठका सुरू आहेत. आज याच पार्श्वभूमिवर शिवसेना, भाजप, काँग्रेसची बैठक झाली. या बैठकांमध्ये पुढील रणनिती ठरवण्यात आली.

हैदराबाद - राज्यातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर विविध राजकीय पर्याय तपासले जात आहेत. त्याअनुषंगाने सर्वच पक्षांचे प्रयत्न आणि बैठका सुरू आहेत. आज याच पार्श्वभूमिवर शिवसेना, भाजप, काँग्रेसची बैठक झाली. या बैठकांमध्ये पुढील रणनिती ठरवण्यात आली.

शिवसेना बैठक - शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत काही प्रमुख प्रस्ताव पारित करण्यात आले. त्यामध्ये एक म्हणजे शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही नावे कोणीही वापरू शकत नाहीत असा दुसरा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्याचबरोबर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही पक्षप्रमुखांना असतील असा तिसरा प्रस्ताव पारित करण्यात आला. हे सर्व प्रमुख प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी उद्ध ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

शिंदे बैठक - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनीही आज गुवाहाटीमध्ये फुटीर आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये पुढे काय पावले उचलायची याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने त्यांच्या गटाचे नाव ठरवण्यात आले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नाव या गटाला देण्याचे ठरवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर शिंदे गटाने आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असा दावा केला. यासंदर्भात एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष यांना पत्र पाठवून आपला गट खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळावी असा दावा करणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट आणि त्यांच्या निर्णयावरच शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे शिंदे काय राजकीय खेळी करतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी गुवाहाटीत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रावर यावे म्हणतात, आणि आमच्या ऑफिस, घरावर हल्ले होतात. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी शपथीचे पालन करावे आणि त्यांनी आपले कर्तव्यपूर्ण करून हे थांबवण्याचे आदेश द्यावेत. शिवसेना कोणीही हायजॉक केलेली नाही असेही ते म्हणाले. आमदारांना दिलेल्या नोटीसांना उत्तर दिले जाईल. त्यामध्ये 24 तासांचा वेळ दिलेला आहे. त्यांना एक आठवड्याचा वेळ मागणार आहोत, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस बैठक - राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात विचार विमर्ष करण्यासाठी काँग्रेसचीही आज बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. या परिस्थितीत काय केले पाहिजे यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे आणि यापुढेही ते कार्यरत राहील असे थोरात म्हणाले. आपले सरकार अल्पमतात नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले. काही कायदेशीर बाबांची विचार करायचा झाला तर त्यासाठी दिल्लीचे कायदा सल्लागार तयार असल्याचेही थोरात म्हणाले.

भाजप बैठक - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचीही बैठक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवासस्थानी किंवा दादरमध्ये पक्ष कार्यालयात ही बैठक होऊ शकते. या बैठकीत भाजपची पुढील राजकीय रणनिती ठरवण्यात येणार आहे. राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपने वेट आणि वॉच अशी भू्मिका घेतली होती. मात्र यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष सक्रिय झाल्यानंतर भाजपने राजकीय खेळी करण्यास सुरुवात केली. आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून लक्ष घालण्याची विनंती केली. आता भाजपची बैठक झाल्यावर त्यामध्ये काय भूमिका घेतली जाते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान सकाळी मुंबई भाजपच्या बैठकीत मुंबईत भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल असा विश्वास भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीशी भाजपाचा संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात सध्या राजकीय भूकंप झाला असून त्याच्या मागे भाजपा असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना राजकीय परिस्थितीशी भाजपाचा संबंध नाही. तो शिवसेनेचा अंतर्गत विषय असे साटम यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात भीतीचे राजकारण, शिवसैनिक आक्रमक, पुण्यात राडा, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर आंदोलने

Last Updated :Jun 25, 2022, 5:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.