ETV Bharat / bharat

काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत सोनिया गांधींची बैठक

author img

By

Published : Apr 10, 2021, 3:47 PM IST

सोनिया गांधी
सोनिया गांधी

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनासंदर्भात काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्रावर टीका केली. योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनासंदर्भात काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांसमवेत आढावा बैठक घेतली. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत कोरोनामुळे राज्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेत सोनिया गांधी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांना कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी चाचणी घेणे, लसीकरण करणे आणि परिस्थितीचा मागोवा घेत राहण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत सोनिया गांधी यांनी केंद्रावर टीका केली. योग्य प्रकारे नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच इतर देशांना कोरोना लसीची निर्यात केल्यामुळे आता भारतात कोरोना लसीचा साठा कमी पडला आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार यासह अनेक राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली होती. इतर लसींनाही वेगवान मार्गाने मान्यता देण्यात यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

लसीचा अभाव हा एक गंभीर मुद्दा -

11 एप्रिलला ज्योतीबा फुले यांची जयंती आहे तर, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यादरम्यान आपण लसीकरण उत्सव साजरा करायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मात्र, राज्यात लसच उपलब्ध नाही तर, जनतेने आणि आम्ही हा कार्यक्रम कसा राबवायचा? असा सवाल केला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे लसीचा अभाव हा एक गंभीर मुद्दा आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटलं.

वेगाने लसीकरण झाले नाही, तर परिणाम गंभीर -

गेल्या 3 महिन्यांत 1 टक्के लोकसंख्या लसीकरण करण्यात सरकार पूर्णपणे यशस्वी झाले आहे. सध्या आपल्याकडे लसींची कमतरता आहे, तर 6 कोटी लस डोस निर्यात करण्यात आल्या आहेत. जर लसीकरण करण्याची गती अशीच राहिली तर 75 टक्के लोकांच्या लसीकरणाला बराच काळ लागेल, ज्याचे भयंकर परिणाम होतील, असेही राहुल यांनी पत्रात म्हटलं.

हेही वाचा - बंगालमध्ये भाजपा सत्तेत येणार? काय म्हणाले प्रशांत किशोर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.