ETV Bharat / bharat

वाढदिवसाच्या 'मुहूर्ता'वर भजनलाल शर्मांचं 'राजतिलक'; राजस्थानचे 14वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 9:38 AM IST

Updated : Dec 15, 2023, 2:08 PM IST

Rajasthan Government Oath Ceremony : राजस्थानमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर आज नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजपाचे भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्री तर दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज ऐतिहासिक अल्बर्ट हॉलसमोर हा शपथविधी सोहळा झाला.

Rajasthan Government Oath Ceremony
Rajasthan Government Oath Ceremony

जयपूर Rajasthan Government Oath Ceremony : राजस्थानमध्ये भाजपाच्या भजनलाल शर्मा यांनी वाढदिवसालाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्र यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आधी सरपंच झाले. त्यानंतर दीर्घकाळ संघटनेत काम केल्यानंतर ते राज्यातील सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचले आहेत. तर दिया कुमारी या जयपूरच्या माजी राजघराण्यातील सदस्य आहेत. यावेळी त्या सर्वाधिक मतांनी विजयी होऊन विधानसभेत पोहोचल्या आहेत. दुसऱ्यांदा आमदार झालेले उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी अशोक गेहलोत यांचे सल्लागार बाबूलाल नागर यांचा पराभव केलाय.

शपथविधीनिमित्त एनडीएचं शक्तिप्रदर्शन : जयपूरच्या रामनिवास बागेतील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलसमोर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच इतर अनेक राजकीय व्यक्ती सहभागी झाले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मनसुख मांडविय, रामदास आठवले, कैलाश चौधरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 18 लोक या समारंभाला राज्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री भजन लाल शर्मा : भरतपूरच्या नादबाईचे रहिवासी भजनलाल शर्मा जयपूरच्या सांगानेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा सुमारे 48 हजार मतांनी पराभव करुन पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. 56 वर्षीय भजनलाल यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून नादबाई इथून आमदारकीची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशीही त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. त्यांनी भाजपाच्या चार प्रदेशाध्यक्षांसह सरचिटणीस म्हणून काम केलंय. ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.

उपमुख्यमंत्री दिया कुमारी : यावेळी राजस्थान विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम करणाऱ्या दिया कुमारी या जयपूरच्या माजी राजघराण्यातील सदस्य आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. त्या दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार झाल्या आहेत. 10 सप्टेंबर 2013 रोजी त्यांनी औपचारिकपणे भाजपामध्ये प्रवेश केला. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जयपूरमधील रॅलीत त्यांना भाजपाचं सदस्यत्व मिळवून दिलं. यानंतर त्या सवाई माधोपूरमधून निवडणूक लढवून आमदार झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तिकिटावर 2019 मध्ये राजसमंदमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली. यावेळी पक्षानं जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं. काँग्रेसच्या सीताराम अग्रवाल यांचा विक्रमी 71,368 मतांनी पराभव करत दिया कुमारी विधानसभेत पोहोचल्या आहेत.

उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा : जयपूर जिल्ह्यातील दुडू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचलेले डॉ. प्रेमचंद बैरवा यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. डॉ. प्रेमचंद बैरवा हे एससी प्रवर्गातून येतात. ते मौजमाबाद तहसीलमधील श्रीनिवास पुरम येथील रहिवाशी आहेत. 2023 ची विधानसभा निवडणूक त्यांनी दुडू इथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लढवून ते आमदार झाले. 54 वर्षीय प्रेमचंद बैरवा यांची शैक्षणिक पात्रता डॉक्टरेट आहे. यापूर्वी डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हजारी लाल नगर यांचा दुडू येथून 33,720 मतांनी पराभव केला होता. यानंतर ते 2018 मध्ये बाबूलाल नगर (अपक्ष) विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. यावेळी पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार बाबूलाल नागर यांचा पराभव करून त्यांनी निवडणूक जिंकली. तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

हेही वाचा :

  1. मोहन यादव यांनी घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधानांसह अमित शाह राहिले उपस्थित
  2. पहिल्यांदा आमदार, संघाच्या जवळचे; जाणून घ्या कोण आहेत राजस्थानचे होणारे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा
Last Updated :Dec 15, 2023, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.