नवी दिल्ली Rail Roko Movement In Punjab : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनांनी पंजाबमध्ये 28 ते 30 सप्टेंबर या कालावधित रेल रोको आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र या आंदोलनात खलिस्तानवादी आंदोलनाला भडकवू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे विभाग आणि गुप्तचर विभाग सतर्क झाला आहे. रेल्वे अधिकारी आणि गुप्तचर विभागातील अधिकारी दोन दिवसापासून पंजाबमध्ये होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती सुरक्षा विभागातील सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीतील रोडवर खलिस्तानवाद्यांचे पोस्टर्स : खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंग निज्जरची हत्या केल्यामुळे भारत आणि कॅनडा वाद रंगला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे भारतातूनही तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. एनआयएनं या खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली. या यादीतील खलिस्तानवादी दहशतवाद्यांचे पोस्टर्स दिल्लीतील रोडवर झळकत आहेत.
पंजाबमध्ये रेल रोको आंदोलन : आपल्या विविध मागण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान इथल्या शेतकऱ्यांनी 28 ते 30 सप्टेंबर या कालावधित पंजाबमध्ये रेल रोको आंदोलनाची घोषणा केली. मात्र खलिस्तानी दहशतवाद्यांचा या रेल रोको आंदोलनात सहभाग असल्याच्या शक्यतेनं रेल्वे आणि गुप्तचर विभाग सतर्क झाले आहेत. गुप्तचर विभागातील अनेक अधिकारी पंजाबमध्ये ठाणं मांडून बसेल आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त एस. सुधाकर यांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही उत्तर दिलं नाही.
लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा : या अगोदर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात खलिस्तानी समर्थकांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावला होता. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आताही जी 20 शिखर परिषदेपूर्वी दिल्लीच्या मेट्रो स्थानकावर खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली होती.
हेही वाचा :