नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीची 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मुंबईत बैठक होणार आहे. त्यापूर्वीच आज काँग्रेस आणि आपची दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपावरुन बैठक होणार आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी लोकसभेच्या जागा वाटपाचा आढावा घेणार आहेत. आप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे या बैठकीला आता महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत दोन्ही पक्ष लोकसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपावर चर्चा करणार असल्याची माहिती दिल्ली काँग्रेस प्रभारी दीपक बाबरीया यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.
दिल्लीत काँग्रेस आप संघर्ष : काँग्रेस पक्ष सध्या मोठ्या संघर्षाच्या काळातून वाटचाल करत आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष होता, मात्र भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला आपसोबत हातमिळवणी करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापुढे भाजपाला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आपसात जमत नसतानाही काही पक्षांना त्यांना सोबत घेऊन लढण्याची तयारी करावी लागत आहे. दिल्लीत आप आणि काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये बेबनावाची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र तरीही भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस ही कसरत करत आहे.
दिल्लीतील नेत्यांचा विरोध : काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 29 मे रोजी दिल्लीत जे पी अग्रवाल, अजय माकन, देवेंद्र यादव, अनिल चौधरी, अरविंदर सिंह लवली आणि हारुन युसुफ आदी नेत्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी आपसोबत कोणत्याही युतीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ती बैठक दिल्ली विधेयकावरुन होती. मात्र तरीही त्या बैठकीत आपच्यासोबत होणाऱ्या संभाव्य युतीला नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंपुढे लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान असेल.
दिल्ली विधेयकात काँग्रेसने दिले होते समर्थन : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रसने दिल्ली विधेयकावरुन आपला आपले समर्थन दिले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खराब असतानाही काँग्रेसने त्यांना संसदेत उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतरही भाजपाने विश्वासमत ठराव जिंकत हे विधेयकही पारित केले. काँग्रेसचे अनेक नेते आपला समर्थन देण्याच्या विरोधात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील माजी खासदार संदीप दीक्षित यांनी तर सार्वजनिक कार्यक्रमात आपला समर्थन देऊ नये, असे काँग्रेस नेत्यांना स्पष्टपणे बजावले होते. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा -