ETV Bharat / bharat

Padma Vibhushan Prabha Atre : पद्म विभूषण प्रभा अत्रे : जीवन, शिक्षण, कारकीर्द आणि पुरस्कार

author img

By

Published : Jan 25, 2022, 9:47 PM IST

प्रभा अत्रे या देशातील शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण जाहीर करण्यात आला आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्याविषयी..

Padma Vibhushan Prabha Atre
पद्म विभूषण प्रभा अत्रे

मुंबई : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. प्रसिद्ध असे पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या आहेत.

आठव्या वर्षांपासून गायनाकडे

१९३२ साली पुण्यातील आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईकडून गायनाकडे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण सुरु केले. शिकत असतानाच त्यांनी हिराबाई यांना देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये साथ देण्यास सुरुवात केली. संगीताचे शिक्षण घेतानाच प्रभा अत्रे यांनी विज्ञान व कायद्याची पदवी मिळवली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही मिळवली.

संगीताच्या प्रचारात महत्वाचे योगदान

प्रभा अत्रे या जगभरात प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी परिचित आहेत. त्यांचे ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रचंड असे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रभा अत्रे या त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अनेकदा स्वरचित बंदिशी सादर करतात. प्रभा अत्रे यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.

१९५५ पासून गायनाचे कार्यक्रम

प्रभा अत्रे या १९५५ सालापासून देशविदेशात गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. त्यांच्या तरुण वयात त्यांनी संगीत शारदा, संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. देश- विदेशांतील अनेक मोठमोठ्या संगीत महोत्सवांमध्ये प्रभा अत्रे यांचे कार्यक्रम झालेले आहेत.

साहित्यक्षेत्रातही मोठे योगदान

प्रभा अत्रे यांचे साहित्यक्षेत्रातही मोठे योगदान आहे. त्यांनी मराठीसह इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. मराठीमधील त्यांचे पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीत आधारित निबंध व लेख आहेत. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' (१९९२) या दुसऱ्या पुस्तकालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी व स्वररंजनी या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. त्यांचे पाचवे पुस्तक, 'अंतःस्वर' हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेतही अनुवाद करण्यात आलेला आहे.

विविध पुरस्कारांनी झालाय गौरव

प्रभा अत्रे यांना संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘आचार्य अत्रे अॅवॉर्ड, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, स्वरसागर संगीत पुरस्कार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा ‘स्वररत्न’ पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऍ़वॉर्ड, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इत्यादी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.