ETV Bharat / bharat

National Cancer Awareness Day : भारतात कॅन्सर रुग्णांची बिकट परिस्थिती; आरोग्य व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 3:02 PM IST

Updated : Nov 7, 2023, 5:26 PM IST

National Cancer Awareness Day : प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम क्युरी यांच्या जयंतीनिमित्त ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो. कर्करोगाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या त्यांच्या अतुलनीय शोधांसाठी मादाम क्युरी ओळखल्या जातात. आजचा दिवस कर्क रोगाचं गांभीर्य आणि त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी समर्पित आहे. कर्क रोगाचं लवकर निदान होणंही गरजेचं आहे, कारण त्यामुळे वेळीच उपचार करुन जीव वाचवता येऊ शकतात. यासंदर्भात डॉ. पी. रघुराम, संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक केआएमएस उषालक्ष्मी ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन, हैदराबाद यांचा अभ्यासपूर्ण लेख.

National Cancer Awareness Day
National Cancer Awareness Day

हैदराबाद National Cancer Awareness Day : देशात कॅन्सर रुग्णांची परिस्थिती काय आहे. उपचारांची काय अवस्था आहे. काय आणि कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसंच कॅन्सरवर मात करण्यासाठी देशपातळीवर काय उपाय करण्याची गरज आहे. हे आज कॅन्सर जागरुकता दिनानिमित्त आपण पाहणार आहोत.

कॅन्सरबाबत वस्तुस्थिती काय - देशात 14, 00, 000 पेक्षा जास्त नवीन कर्करुग्णांचं निदान झाले आहे. तसंच दरवर्षी 8,50,000 पेक्षा जास्त मृत्यू भारतात कर्करोगानं होतात. या आकडेवारीकडं पाहिल्यावर भारतातील कर्करोगाची ‘त्सुनामी’ ही सार्वजनिक आरोग्याची प्रमुख चिंताजनक बाब असल्याचं ध्यानात येतं. कर्करोगाच्या नोंदी आणि वास्तव याचा विचार केल्यास त्या 1.5 ते 3 पट जास्त आहेत. ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी (GLOBOCAN) च्या प्रकल्पानुसार ही आकडेवारी 2040 पर्यंत दुप्पट होण्याची भीती आहे. कर्करोगाच्या 2020 च्या WHO च्या रँकिंगनुसार, नवीन वार्षिक कर्करुग्णांच्या नोंदीबाबतीत भारत चीन आणि अमेरिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की 9 पैकी 1 भारतीयाला कर्करोग होईल आणि त्यातील 15 पैकी एकाचा मृत्यू होईल. तसंच इतर विकसनशील देशांच्या तुलनेत भारतात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे, ही आणखी चिंताजनक बाब आहे. भारतातील कर्करोगाचं प्रमाण 6.8% (2015 ते 2020) च्या CAGR (कंपाऊंड एन्युअल ग्रोथ रेट) ने वाढत असल्याचा अंदाज आहे, हा आकडा चीन (1.3%), ब्राझील सारख्या इतर विकसनशील देशांपेक्षा लक्षणीय आहे. इतर देशांचा विचार करता इंडोनेशिया (4.8%) तसंच यूके (4.4%) अशी आकडेवारी आहे. भारतातील ५०% रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण मेंदू, मान, स्तन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कर्करोगाचे आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग हा पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोग आहे. तर स्तनाचा कर्करोग हा भारतातील महिलांना होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

देशात अपुरी आरोग्यसेवा - कॅन्सरसारख्या आजारात देशात जागरूकतेच्या अभावामुळे आकडा वाढतो. तसंच देशव्यापी निदान प्रणाली नसल्यानं गंभीर परिणाम होतात. देशात अपुरी आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा याचाही परिणाम होतो. असमानता आणि उच्च-उत्पन्न असलेल्या देशांच्या तुलनेत भारतातील ७०% पेक्षा जास्त कर्करोगाचे रुग्ण जवळ-जवळ अंतिम टप्प्यात आल्यावर उपचाराची सुरुवात करतात. त्यामुळे मृत्यूसह सर्वाधिक आहे. त्यामुळेच अनेकांना निदान झाल्यानंतर वर्षभराच्या आतच मृत्यू होते.


कर्करोगावरील उपाय - एकदा का कर्करोगाचं निदान झालं की, त्याचे गंभीर सामाजिक, आर्थिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक परिणाम होतात. केवळ एका व्यक्तीवर हे होत नाही तर संपूर्ण कुटुंबावर याचा परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगाच्या प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करणं लवकर निदान करणं आणि प्रभावी उपचार प्रदान देणं गरजेचं असतं. खरं तर, कर्करोग प्रतिबंध, स्क्रीनिंग आणि लवकर निदान हे भारतातील कर्करोगाचा प्रभाव रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी सर्वात महत्वाचे आणि प्रभावी उपाय आहेत.

1. कर्करोग प्रतिबंध - कर्करोगावरील सर्वात अलीकडील WHO च्या अहवालानुसार, सर्व कर्करोगांपैकी अंदाजे अर्ध्याहून अधिक कर्करोग टाळता येण्याजोगे आहेत. प्राथमिक आरोग्य सेवा आणि सुविधांच्या सक्रिय सहभागासह कर्करोग प्रतिबंध हा कर्करोगाच्या काळजीचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. प्राथमिक प्रतिबंधामध्ये तंबाखूचं सेवन बंद करणं, अल्कोहोलचं सेवन मर्यादित करणं, निरोगी आहार राखणं, शारीरिक हालचाल जसं की चालणं व्यायाम वाढवणं, रेडिएशन आणि एचपीव्ही लसीकरण कमी करणं, यासारख्या उपायांचा उपयोग होतो. भारत सरकारनं 2018 मध्ये सुरू केलेल्या आयुष्मान भारत कार्यक्रमाचा यामध्येही फायदा झाल्याचं दिसतं.

2. कर्करोगाबाबत जागरूकता - कर्करोगासंदर्भात जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर निदान होऊ शकते. यातूनच जास्तीत जास्त जीव वाचू शकतात. उदाहरणार्थ, उषालक्ष्मी ब्रेस्ट कॅन्सर फाऊंडेशननं सुरू केलेल्या पिंक रिबन मोहिम राबवली. तसंच 2007 मध्ये ब्रेस्ट कॅन्सर चॅरिटी स्थापन केली. यामुळे तेलुगु राज्यांमध्ये जागरुकता निर्माण केली. याद्वारे 'स्तन कर्करोग' नियंत्रणात आणण्यात मोठा हातभार लागला. गेल्या 16 वर्षांत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यातून राबवण्यात आले. परिणामी मानसिकतेत बदल घडवून आणला गेला. या भागात 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलां वार्षिक स्क्रीनिंग मॅमोग्रामसाठी नेहमीच तयार असतात. याबरोबरच सरकारनं सिगारेट आणि तंबाखू आधारित उत्पादनांच्या थेट जाहिरातींवर बंदी घातली आहे. मात्र सरोगेट जाहिराती अजूनही मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटी माऊथ फ्रेशनर्स, 'इलायची' आणि पान मसाला ब्रँडचे समर्थन करतात. मजबूत कायद्याद्वारे या सरोगेट जाहिरातींना आळा घालण्याची नितांत गरज आहे.

3. कर्करोगाचं लवकरात लवकर निदान - काही कॅन्सर स्क्रीनिंगद्वारे लवकर ओळखले जाऊ शकतात. स्क्रिनिंगमधून लक्षणे दिसण्याआधीच कर्करोगाचं निदान होऊ शकतं. ज्यामध्ये अनेक जीव वाचवण्याची क्षमता असते. उदाहरणार्थ: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर, स्तनाच्या कर्करोगासाठी मॅमोग्राफी, कोलन कर्करोगासाठी कोलोनोस्कोपी केल्यास वेळीच कर्करोगाला आळा घालता येऊ शकतो. 2016 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारनं सुरू केलेल्या पॅन इंडिया स्क्रीनिंग कार्यक्रमाचा उद्देश तोंड, गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वसमावेशकपणे स्क्रीनिंग करणे हा आहे. तथापि, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NHFH – 5) द्वारे जारी केलेल्या ताज्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की केवळ 1.1% लोकसंख्येची गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी आणि 1% पेक्षा कमी स्तन आणि तोंडाच्या कर्करोगासाठी तपासणी केली गेली आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, कर्करोग आणि स्ट्रोक (NPCDCS) च्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रमातून सरकारनं तातडीची बाब म्हणून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

4. सर्वंकष कर्करोग नोंदणीची गरज - कर्करोगाचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी योग्य कॅन्सर नोंदणी ही मूलभूत गरज आहे. कर्करोग रोखण्यासाठी आणि त्यावर योग्य आणि वेळीच उपाययोजना करण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होतो. याचा सरकारी पातळीवर योजना आखण्यासाठीही फायदा होतो. सध्या देशात अत्यंत तुटपुंजी अशी कर्करोग निदान आणि नोंदणी यंत्रणा आहे. लोकसंख्येच्या फक्त 10% ही यंत्रणा आहे. गंमत अशी आहे की त्यापैकी बहुतेक शहरी भागात आहेत. ग्रामीण भागात फक्त 2 PBCRs आहेत, जिथे भारतातील 70% लोक राहतात. शिवाय, यासाठी निधीचीही कमतरता भासते. आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि राजस्थान या मोठ्या राज्यांमध्ये अद्याप एकही नोंदणी यंत्रणा नाही. हॉस्पिटलमध्ये 268 हॉस्पिटल आधारित कॅन्सर नोंदणी केंद्रं आहेत, ज्यात केवळ कॅन्सरच्या रूग्णांची नोंद केली जाते. ही परिस्थिती पाहता आणखी PBCR उपलब्ध करून देण्याची नितांत गरज आहे. ग्रामीण भागात तर त्याच नितांत आवश्यकता आहे.

5. कॅन्सर रुग्णांचे वर्गीकरण आवश्यक - आरोग्यासाठीच्या संसदीय स्थायी समिती आणि कुटुंब कल्याण समितीनं शिफारस केली आहे की सप्टेंबर २०२२ मध्ये कॅन्सरला नोंदणीयोग्य आजार म्हणून वर्गीकृत केलं जावं. तथापि, हे प्रत्यक्षात आलेलं नाही. कर्करोगाला "सूचनायोग्य रोग" बनविण्यामुळे कर्करोगाच्या मृत्यूचा एक मजबूत डेटाबेस तयार होईलच, परंतु देशातील कर्करुग्णांची संख्या आणि व्यापकता अचूकपणे समजायलाही मदत होईल.

6. सर्वसमावेशक कर्करोग केंद्रे - कर्क रुग्णांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपचार यासाठी “व्यापक कर्करोग केंद्र” ची गरज आहे. तसंच फक्त त्याचसाठी पथकं नेमली पाहिजेत. कर्करोगावरील उपचार एकाच छताखाली झाले पाहिजेत. रेडिओलॉजी सेवा, तसंच इतर प्रगत तंत्रज्ञानही तिथं असलं पाहिजे. याबरोबरच निदानासाठी इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, आण्विक निदान आणि आण्विक औषध सुविधा असल्या पाहिजेत. देशात सध्या सुमारे 500 व्यापक कर्करोग केंद्रे (CCCs) आहेत. त्यापैकी 25 ते 30% सरकारी मालकीची आहेत, तर बाकीची खासगी किंवा ट्रस्ट-आधारित सुविधा आहेत. बहुतेक CCC महानगरे आणि राज्यांच्या राजधानीत आहेत. परिणामी, ग्रामीण भागात राहणार्‍या बहुतेक रूग्णांना सर्वसमावेशक कॅन्सर उपचार घेण्यासाठी लांबचा प्रवास करुन शहरात यावं लागतं. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्यांची प्रचंड गैरसोय होते. त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच, शहरे आणि ग्रामीण भागात युद्धपातळीवर कॅन्सरची काळजी घेण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये झपाट्याने वाढ करणं अत्यंत आवश्यक आहे.

भारतातील कर्करोगाचं व्यवस्थापन करणं हे खूपच आव्हानात्मक आहे. जरी आपण अभूतपूर्व वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गावर असलो तरी, देशात उत्तम कॅन्सर उपचार सेवा मिळण्यात अनेक अडचणी आहेत. भारतातील काही उत्कृष्ट कॅन्सर निदान आणि केंद्रं जगातील सर्वोत्कृष्ट केंद्रांशी तुलना करता अत्याधुनिक आहेत. मात्र प्रत्येक सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील कर्करोगाच्या रूग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम सुविधा मिळेल यासाठी यात वाढ करणं गरजेचं आहे. योग्य उपचाराबरोबरच ते परवडतील हीही पाहिलं पाहिजे.

सरकारने कॅन्सरला “नोटिफायेबल डिसीज” बनवण्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, लवकर निदान, जास्तीत जास्त उपलब्धता यांची सोय केली पाहिजे. यासाठी दीर्घकालीन योजना आखून पावलं उचलली पाहिजेत.

हेही वाचा

  1. Cancer Cases In India: कॅन्सरग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ; रुग्णसंख्येत भारत तिसऱ्या स्थानी
  2. National Cancer Institute At Nagpur: 'नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट' कॅन्सरग्रस्तांसाठी ठरतेय वरदान; स्वस्तात परिपूर्ण उपचाराची सुविधा
  3. Breast Cancer Awareness Month 2023 : 'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ' 2023; स्तनामध्ये 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी साधा संपर्क...
Last Updated : Nov 7, 2023, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.