इंफाळ Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन तरुण विद्यार्थ्यांच्या हत्येविरोधातील निदर्शनांनी गुरुवारी रात्री उग्र रूप धारण केलं. आंदोलकांनी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील हेनगांगमध्ये मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खासगी निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही तेथे राहात नाही.
जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराची नळकांडी फोडली : यावेळी आंदोलकांनी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील प्रदेश भाजपा अध्यक्ष अधिकारीमयुम शारदा देवी आणि भाजपा आमदार सोराईसम केबी यांच्या निवासस्थानांनाही लक्ष्य केलं. मात्र सुरक्षा दलानं तत्काळ हस्तक्षेप करत जमावाला पांगवण्यासाठी ठिकठिकाणी अश्रुधुराची नळकांडी फोडली. या दरम्यान सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये चकमकही झाली. सध्या मणिपूरमधील परिस्थिती तणावपूर्ण असून, सरकारनं राज्यातील सर्व शाळा २९ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारनं मंगळवारीच मोबाईल इंटरनेटवर बंदी लागू केली होती.
इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू : आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. हिंसाचाराची परिस्थिती टाळण्यासाठी मणिपूर पोलीस, सीआरपीएफ आणि जलद कृती दलाचे जवान इम्फाळ खोऱ्यात मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. मंगळवारपासून सुरू असलेल्या आंदोलनात आत्तापर्यंत ६५ आंदोलक जखमी झाले असून, सुरक्षा दलांनी बुधवारी इंफाळ पूर्व आणि पश्चिम या दोन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली.
काय आहे प्रकरण : मणिपूरमध्ये ६ जुलै रोजी १७ वर्षीय विद्यार्थी हिझाम लिंथोइंगम्बी आणि २० वर्षीय फिजाम हेमजीत बेपत्ता झाले होते. त्यानंतर सोमवारी त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित झाली. ही छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर राज्यात निदर्शनं सुरू झाली. या दरम्यान आंदोलकांनी थौबल जिल्ह्यात भाजपाचं कार्यालय जाळलं. सशस्त्र हल्लेखोरांनी या मुलांची हत्या केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय. हे दोन्ही मृत विद्यार्थी बिष्णुपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.
शांततेसाठी मुख्यमंत्री काहीही करत नसल्याचा आरोप : यानंतर दहशतवादाशी संबंधित प्रकरणं हाताळण्याचं कौशल्य असलेले श्रीनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूरमध्ये परत बोलवण्यात आलं. आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी संपूर्ण परिसरात वीज कनेक्शन खंडित करण्यात आलंय. आंदोलकांपैकी एकानं आरोप केला की मुख्यमंत्री, इतर मंत्री, आमदार आणि भाजपा नेते मणिपूरमधील स्थिती पूर्ववत करण्यासाठी काहीही करत नाहीत. कुकी अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांच्या हिंसक कारवायांविरुद्धही ते मौन बाळगून आहेत, असा आरोप आंदोलकांनी केलाय.
हेही वाचा :