ETV Bharat / bharat

India Population Overtakes China : भारतीयांचा नादच खुळा; लोकसंख्येबाबतीत चीनलासुद्धा टाकले मागे

author img

By

Published : Apr 19, 2023, 2:16 PM IST

Updated : Apr 19, 2023, 3:23 PM IST

भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. भारताने आता चीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांनी आज याबाबतची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताने बाजी मारली आहे.

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश

नवी दिल्ली : चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी आज जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी असून चीनची १४२.५७ कोटी आहे.

जगामधील वेगवेगळ्या देशांच्या लोकसंख्येच्या आकड्यांचा अभ्यास संयुक्त राष्ट्रांनी सुरू केला होता. संयुक्त राष्ट्रांनी 1950 मध्ये लोकसंख्येची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता पहिल्यांदाच भारताने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या संयुक्त राष्ट्रांच्या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे. आजपर्यंत चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असल्याची नोंद होती. आता भारत या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे.

चीनची लोकसंख्या नेहमीच जगात सर्वाधिक राहिली आहे. चीनचे दिवंगत नेते माओ झेडोंग यांनी विनाशकारी कृषी धोरण अवलंबले होते. त्या काळात चीनमध्ये लाखो लोक भुकेने मरण पावले होते. तेव्हा म्हणजेच 1960 मध्ये चीनची लोकसंख्या कमी झाली होती. त्यानंतर प्रथमच चीनमधील लोकांची संख्या गेल्या वर्षी कमी झाली. आता तर चीन एक नंबरवरुन दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

चीनमध्ये लोकसंख्या कमी होण्याची अनेक कारणे होती. त्यामधील एक प्रमुख कारण म्हणजे जन्मदर कमी झाल्यामुळे आणि प्रजननक्षम लोकसंख्याही घसरल्याने चीनमधील लोकसंख्या कमी झाली आहे. याच एका प्रमुख कारणामुळे लोकसंख्याशास्त्रीय घसरणीचाही सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून चीनमधील बर्‍याच प्रदेशांनी जन्मदर वाढवण्याच्या योजना देखील जाहीर केल्या आहेत. मात्र त्यामध्ये यश आल्याचे दिसत नाही. तसेच लोकसंख्या वाढीचे अधिकृत प्रयत्नही तेवढे यशस्वी ठरले नाहीत.

वास्तविक 2011 सालापासून भारताची जनगणना न केल्यामुळे भारताकडे किती लोक आहे याचा नेमका कोणताही अलीकडील अधिकृत डेटा उपलब्ध नाही. भारताची दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. त्यानुसार भारताची जनगणना 2021 मध्ये होणार होती. परंतु कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे त्याला उशीर झाला आहे. मात्र नियमित अंदाजित आकडेवारीनुसार देशाची लोकसंख्या किती असेल याचे ठोकताळे बांधण्याची पद्धत आहे. त्यानुसार भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा जास्त झाली आहे.

Last Updated :Apr 19, 2023, 3:23 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.