Devendra Fadnavis On Sanatan : सनातनला हटवण्याची मानसिकता असणाऱ्यांना ठेचून काढू - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis On Sanatan : सनातनला हटवण्याची मानसिकता असणाऱ्यांना ठेचून काढू - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Sanatan : इंदूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 'अशा मानसिकतेच्या लोकांना निवडणुकीत त्यांची जागी दाखवण्याची गरज आहे', असं ते म्हणाले.
इंदूर (मध्य प्रदेश) Devendra Fadnavis On Sanatan : मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून, प्रचारालाही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीनं मध्य प्रदेशातील विविध भागात जन आशीर्वाद यात्रा काढलीय. इंदूर मधील जनआशीर्वाद यात्रेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सोमवारी ही यात्रा महू येथे पोहोचली. येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यात्रेत सहभागी झाले. यावेळी जनतेला उद्देशून बोलताना त्यांनी, 'भाजपाला पुन्हा आशीर्वाद द्या', असं आवाहन केलं.
विरोधकांनी एकत्र येणं त्यांची मजबुरी : 'भाजपा सरकार जनतेच्या मदतीसाठी सतत कार्यरत आहे. मध्य प्रदेशात 'लाडली' सारख्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत', असं फडणवीस म्हणाले. 'विरोधकांनी एकत्र येणं त्यांची मजबुरी आहे. मोदींना हटाव, हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. मोदी पुन्हा निवडून आले तर आपली दुकानं बंद होतील असं त्यांना वाटतं', असा हल्लाबोल फडणवीसांनी केला.
सनातनला हटवण्याची मानसिकता असणाऱ्यांना ठेचून काढू : द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी, 'सनातन धर्म डेंग्यू-मलेरियासारखा आहे. तो नष्ट झाला पाहिजे', असं वक्तव्य केलं होतं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 'हजारो वर्षांपासून बाह्य आक्रमकांनी भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा नाश करण्याचा प्रयत्न केला. पण ते असं करू शकले नाहीत. जेव्हा-जेव्हा सनातनला नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धे हातात तलवार घेऊन लढले. सनातनला हटवण्याची मानसिकता असणाऱ्यांना आम्ही ठेचून काढू. या निवडणुकीत अशा मानसिकतेच्या लोकांना त्यांची जागी दाखवण्याची गरज आहे', असा घणाघात फडणवीसांनी केला.
कॉंग्रेसनं पाकिस्तानातून गाणं चोरलं : राज्यात लवकरच कॉंग्रेसची यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी कॉंग्रेसनं एक गाणं रिलीज केलं. या गाण्यावरून फडणवीसांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. 'काँग्रेसनं यात्रेचं जे गाणं रिलीज केलं ते पाकिस्तानातून चोरलं आहे', असा आरोप त्यांनी केला. 'पाकिस्तानात इम्रान खान यांच्या यात्रेच्या गाण्यातील त्यांच नाव काढून काँग्रेसचं नाव वापरण्यात आलं आहे. तिथे 'चलो चलो इम्रान' म्हटलं होतं. त्याऐवजी यांनी 'चलो चलो काँग्रेस' म्हटलं आहे', असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :
