दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

author img

By

Published : Sep 20, 2021, 2:00 PM IST

Charanjit Singh Channi

दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी पंजाबमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. नुकताच अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांची जागा चरणजित यांना देण्यात आली.

चंदीगड/नवी दिल्ली : दलित नेते चरणजित सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सुनील जाखड़, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सर्व नेते यावेळी उपस्थित होते.

पंजाबमधील पहिलेच दलित मुख्यमंत्री

काँग्रेसमधील प्रदीर्घ संघर्ष आणि अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांची रविवारी पंजाबमधील पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली. 58 वर्षीय चन्नी हे राज्याचे मुख्यमंत्री बनणारे पंजाबमधील पहिले दलित नेते आहेत.

विधीमंडळ पक्षाचे नेते चन्नी निवडून आल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि प्रदेश प्रभारी हरीश रावत यांनी राजभवन गाठून राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग, मनीष तिवारी आणि इतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी चन्नीचे अभिनंदन केले. दरम्यान, राजीनामा दिलेले अमरिंदर सिंग यांनी आशा व्यक्त केली की ते सीमावर्ती पंजाब आणि लोकांचे संरक्षण करू शकतील.

2007 पासून प्रत्येक विधानसभा निवडणूक जिंकले

चन्नी दलित शीख (रामदासिया शीख) समाजातून येतात. ते अमरिंदर सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते. ते रूपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 2007 मध्ये ते प्रथमच या प्रदेशातून आमदार झाले. त्यानंतर ते सलग निवडणूक जिंकत आले आहेत. शिरोमणी अकाली दल-भाजप युती सरकारच्या काळात ते 2015-16 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

पंजाबचे राजकारण दलित नेत्याला समोर ठेवून

विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून काँग्रेस एक सामाजिक समीकरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. राज्यात दलितांची लोकसंख्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. काँग्रेसची ही खेळी या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे, की भाजपने पूर्वी सांगितले होते की पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास दलिताला मुख्यमंत्री बनवले जाईल. बसपाशी युती असलेल्या शिरोमणी अकाली दलाने दलित उपमुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले आहे. आम आदमी पार्टी देखील दलित समाजाला आकर्षित करण्याचा सतत प्रयत्न करत आहे.

अमरिंदर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर 'वारंवार आमदारांची बैठक बोलावली गेली. यामुळे मला अपमानित वाटले. त्यानंतर मी हे पाऊल उचलले', असे त्यांनी म्हटले. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून अलीकडील राजकीय घडामोडींवर दुःख व्यक्त केले. तसेच, चिंता व्यक्त केली, की या घडामोडींमुळे राज्यात अस्थिरता निर्माण होऊ शकते.

हेही वाचा - भाजपमध्ये गेलेले सगळे हरिश्चंद्र झालेत; पहा संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.